गेल्या काही महिन्यापासून नाशिकरोड परिसरामध्ये रस्त्याच्या एका बाजूने गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करून गॅस पाईपलाईन टाकण्यात आली होती. त्यानंतर काही ठिकाणी मनपा प्रशासनाने मुरूम टाकून तर काही ठिकाणी खडी व डांबर टाकून खड्डा बुजवला होता. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे ज्या ठिकाणी मुरूम टाकून गॅस पाईपलाईनसाठी खोदलेला खड्डा बुजविण्यात आला होता त्या ठिकाणी मुरूम खड्ड्यात बसून गेल्याने खोलगट भाग निर्माण झाला आहे. तसेच पावसाच्या संततधारेमुळे बिटको पॉईट, दत्त मंदिर सिग्नल चौक, दत्त मंदिर रोड, नाशिक-पुणे महामार्ग, उड्डाणपूल, जेलरोड, आंबेडकर रोड, गंधर्वनगरी रस्ता, शिखरेवाडी रोड, विभागीय आयुक्त कार्यालय आदी महत्त्वाच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच सिन्नरफाटा ते दारणा नदी पुलापर्यंत दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. बिटको व दत्तमंदिर सिग्नल चौकात खड्डे पडल्याने सिग्नल सुटल्यावर वाहने हळूहळू जात असल्याने वाहतुकीचा गोंधळ होत आहे. रस्त्यावरील छोट्या-मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी स्लिप होऊन छोटे-मोठे अपघात होत आहेत. मनपा प्रशासनाने खड्ड्यामध्ये मुरूम टाकून तात्पुरते बुजवण्यापेक्षा खडी व डांबर टाकून खड्डे व्यवस्थित बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. (फोटो २१ रोड)
नाशिक‘रोड’ नव्हे, खड्ड्यांचे आगार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:18 AM