नाशिक : पुण्याच्या धर्तीवर आता नाशिकमधील मॉल्समध्ये मोफत पार्किंग करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. यासंदर्भात सर्व मॉल्सला नोटिसा बजावून कोणतेही शुल्क आकारू नये याबाबत कळविण्यात येणार आहे. शिवाय, शहरातील एका मोठ्या मॉल्सचालकांने वाहनतळासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे महापालिकेला बंधपत्र देऊनही प्रत्यक्षात मात्र नागरिकांची लूट केल्याचा आरोप करण्यात आला. या मॉललादेखील नोटीस देण्याचे ठरविण्यात आले.मंगळवारी (दि.२५) महासभेत यासंदर्भात शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी प्रस्ताव मांडला होता. त्यांनी चर्र्चेच्या दरम्यान नगररचना सहायक संचालक सुरेश निकुंभे यांना अनेक प्रश्न विचारले, मात्र त्यांनी नियमांची माहिती दिली. यावर गुरुमित बग्गा आणि दिनकर पाटील यांनी कोणत्याही व्यापारी संकुल किंवा मॉल्सला किती वाहनतळ अनुज्ञेय असते, तसेच त्यांना शुल्क आकारता येते काय याबाबत प्रश्न केला. त्यावर नगररचना अधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही. तथापि, बांधकाम नियंत्रण नियमावलीनुसार जर वाहनतळासाठी व्यापारी सकुंलांना जागा सोडणे बंधनकारक असेल तर त्यांच्याकडून होणारी शुल्क आकारणी बेकायदा असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. काही मॉल्सचालक हे वाहनचालकांकडून शुल्क घेऊन पावत्या देतात आणि बाहेर पडताना त्या परत काढून घेतात या माध्यमातून नागरिकांची लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात आला, तर शहरातील एका मोठ्या मॉल्स संदर्भात प्रश्न केल्यानंतर संबंधित मॉल्सला अनुज्ञेय वाहनतळापेक्षा जास्त जागा सोडून घेण्यात आली आहे. शिवाय त्याने शंभर रुपयांच्या बंधपत्रावर वाहनतळ शुल्क घेणार नाही, असे लिहून दिले असल्याचे नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता राजू आहेर यांनी सांगितल्यानंतर २००६ पासून या मॉल्समध्ये नागरिकांची लूट झाली असून, त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्याची मागणी गामणे यांनी केली.खेडे विकासाची कामे होणारमहापालिका क्षेत्रातील २३ खेड्यांमध्ये मूलभूत सुविधांची कामे होत नसल्याची लक्ष्यवेधी शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी मांडली होती. त्यांनी प्रशासन खेड्यांची उपेक्षा करीत असल्याचा आरोप केला. त्यावर महापौरांनी खेड्यांमध्ये सर्व कामे होतील त्यासाठी प्राकलने तयार करण्याचे आदेश दिलेत. गंगापूररोड येथील एका भागातील मार्गाला कै. एन. एम. आव्हाड यांचे नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
नाशकात आता मॉल्समध्ये फ्री पार्किंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:59 AM