नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गुरूवारी (दि.७) जिल्ह्यात रात्री साडेनऊ वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५२१ वर पोहचला. मालेगावमध्ये सर्वाधिक ४२० कोरोनाबाधित रुग्ण अद्याप आढळून आले आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांचा आकडा आता २६ वर जाऊन पोहचला आहे.एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून गरजेपुरतेच बाहेर पडावे, तेदेखील योग्य ती काळजी घेऊनच असे आवाहन जिल्हा व आरोग्य प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडूनही केले जात आहे; मात्र नागरिकांमध्ये त्याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.नाशिक जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून शहरातील जवळपास सर्वच दुकाने खुली करण्याची मुभा दिली आहे. अर्थचक्राला गतिमान करण्यासाठी प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला असला तरीदेखील त्याचा गैरफायदाच अधिक घेतला गेल्याचे दिवसभराच्या चित्रावरून दिसून आले. तसेच आता दुकाने खुली ठेवण्याची वेळ देखील सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आली आहे. गुरूवारी शहरातील बाजारपेठांमधील काही भागात नागरिकांनी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान चांगलीच गर्दी केली होती. रणरणत्या उन्हात नागरिक विविध वस्तूंची खरेदी करताना दिसून आले. महिन्याचा पहिला आठवडा पूर्ण होत असल्याने किराणा दुकानांवरदेखील आता महिन्याचा किराणा भरण्यासाठी रांगा नजरेस पडू लागल्या आहेत. शहरात एकूण १४ उपनगरांचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. टाकळीजवळील समतानगर भागातदेखील एका ट्रकचालकाचा कोरोना चाचणी अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
- कोरोना अपडेट्स
- पॉझिटिव्ह रूग्णसंख्या अशी...
नाशिक ग्रामिण - ५७नाशिक मनपा - २६मालेगाव मनपा - ४२०जिल्हा बाहेरील - १८एकूण : ५२१---
- पुर्णपणे बरे झालेले रुग्ण ४६
- कोरोणाग्रस्त एकूण १९ रुग्णांचा बळी (मालेगावमधील १८)
- रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण एकूण ४५६
- अद्याप ६०० कोरोना नमुना चाचणी अहवालांची प्रतीक्षा कायम
गुरूवारी १४९ संशयित रूग्णांची भरगुरूवारी दिवसभरात नाशिक जिल्ह्यात तब्बल १४९ कोरोना संशयित रूग्णांची भर पडली आहे.एकूणच कोरोना संशयित रूग्णांचा आकडाही वाढत आहे. यामध्ये १० रूग्ण जिल्हा रूग्णालयात तर मालेगाव मनपा रूग्णालयांता एकूण ४० आणि नाशिक ग्रामिणमध्ये सुमारे ९९ कोरोना संशयित रूग्ण आढळून आले आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात आज एकही संशयित रूग्ण आढळलेला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली आहे.