नाशिक - महापालिकेकडून खासगी एजन्सीमार्फत शहरात सुरू असलेल्या वृक्षगणनेत ४० लाखाचा आकडा पार झाला असून त्यात आणखी दीड ते दोन लाख वृक्षांची भर पडण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षात शहरातील वृक्षसंपदेत सुमारे दोन ते अडीच पटीने वाढ झालेली आहे. यामध्ये काही दुर्मीळ प्रजातीचेही वृक्ष आढळून आले आहेत. दरम्यान, आर्टीलरी सेंटर, नोटप्रेससह शहरातील औद्योगिक वसाहतीतील मोजणी अद्याप बाकी आहे.महापालिकेमार्फत जीआयएस, जीपीएस या अत्याधुनिक तंत्राद्वारे वृक्षगणना करण्यात येत आहे. वृक्षगणनेचे काम महापालिकेने मे. टेराकॉन इकोटेक या खासगी एजन्सीला दिले आहे. त्याचा प्रारंभ नोव्हेंबर २०१६ मध्ये करण्यात आला होता. गेल्या १४ महिन्यात संबंधित एजन्सीने केलेल्या वृक्षगणनेत आतापर्यंत ४० लाख २ हजार ९३१ वृक्ष आढळून आले आहेत. त्यात त्यात २४५ प्रजाती आढळून आल्या आहेत. यामध्ये औषधी गुणधर्म असलेल्या २५ प्रजाती, फळझाडांच्या ६१ प्रजाती आढळून आल्या आहेत. सुमारे ८० दुर्मीळ प्रजातीही सापडल्या आहेत. यापूर्वी महापालिकेने २००७ मध्ये वृक्षगणना केली होती. त्यावेळी १८ लाखांच्या आसपास वृक्षसंपदा आढळूून आली होती. दहा वर्षात शहराचा विस्तार वाढत असतानाच वृक्षसंख्येतही सुमारे दोन ते अडीच पटीने वाढ झालेली आहे. शहरात पर्यावरणप्रेमी संघटनांकडून होणारी जागृती, महापालिकेसह स्वयंसेवी संस्थांकडून वृक्षारोपणाबाबत घेण्यात येणारी दक्षता यामुळे शहरात हिरवाई निर्माण होण्यास मदत झालेली आहे. खासगी एजन्सीमार्फत वृक्षगणना अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेला लष्करी भाग असलेले आर्टीलरी सेंटर, करन्सी नोट प्रेससह औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखानदारांच्या जागेत वृक्षांची गणना करण्याची परवानगी प्राप्त झालेली नाही. महापालिकेला परवानगी मिळाल्यानंतर वृक्षसंपदेत आणखी दीड ते दोन लाख वृक्षांची भर पडण्याची शक्यता आहे.अद्ययावत दस्तावेज तयारसंबंधित मे. टेराकॉन इकोटेक कंपनीमार्फत मोजणी होऊन प्रत्येक वृक्षाची नोंद संगणकात केली जात आहे. त्यात आजारी व धोकादायक वृक्षांच्याही नोंदी होत आहेत. त्यामुळे मनपाच्या उद्यान विभागाला त्यानुसार पुढील कार्यवाही करणे सुलभ होत आहे. वृक्षसंपदेचा हा अद्ययावत दस्तावेज महत्वपूर्ण ठरणार आहे.
नाशिकमध्ये वृक्षगणनेत ४० लाखांचा आकडा झाला पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 4:05 PM
खासगी एजन्सीमार्फत मोजणी : लष्करी भागासह कंपन्यांमध्ये गणना बाकी
ठळक मुद्देगेल्या दहा वर्षात शहरातील वृक्षसंपदेत सुमारे दोन ते अडीच पटीने वाढ झालेली आहेमहापालिकेमार्फत जीआयएस, जीपीएस या अत्याधुनिक तंत्राद्वारे वृक्षगणना करण्यात येत आहे