नाशिक : जिल्ह्याला 'तौक्ते' चक्रीवादळाच्या पर्श्वभूमीवर हवामान खात्याकडून देण्यात आलेला 'ऑरेंज अलर्ट' मंगळवारीही (दि.18) कायम ठेवण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून शहरात पावसाची संततधार सुरु असून मंगळवारी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत 13.5 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
आजदेखील शहरासह ग्रामीण भागात ढगाळ हवामान आणि जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गुजरात किनारपट्टीवर सोमवारी मध्यरात्री वादळ धडकल्यानंतर हे वादळ जमिनीवरून मार्गक्रमण करण्याची श्यक्यता आहे. त्यामुळे गुजरात सीमेच्याजवळ असलेल्या नाशिकच्या काही तालुक्यांच्या भागात जोरदार पाऊस होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही तसेच वाऱ्याचा वेगदेखील राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील नागरीकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हरसूल भागातील काही घाटमाथ्यासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच या भागात ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळे वातावरणाचा अंदाज घेतल्यानंतरच शेतकऱ्यांनी तसेच शेतमजुरांनी शेतावर जावे. वादळी वारे आणि पाऊस असल्यास शेतीची कामे बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.