नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात गांजा पुरवठा करणारा गांजा तस्करीतील म्होरक्या अकबर सदबल खान (रा. जयपूर, ओडिशा) यास पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायलयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ या तस्करीत अटक केलेल्या उर्वरीत तिघांच्याही पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली असून त्यांच्या बॅक खात्याची चौकशी केली जाणार आहे़ याबरोबरच या संशयिताचे सीडीआर रिपोर्ट काढून संपर्कातील व्यक्तींची चौकशी होणार असून यामध्ये अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़
शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने गत मंगळवारी तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळील सापळा रचून एका आयशर ट्रकमधून ६८० किलो गांजा जप्त केला होता़ या प्रकरणी दोन संशयितांना अटक केल्यानंतर चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर येथे छापा टाकून ३९० किलो गांजा व आणखी एका संशयितास अटक करण्यात आली़ या तिघांचीही कसून चौकशी केल्यानंतर ओडीसातील अकबर खान हा संपूर्ण महाराष्ट्रात गांजा पुरवित असल्याचे समोर आले़ त्यानुसार गुन्हे शाखेने चार दिवसांपुर्वी संशयित अकबर यास अटक केली़
संशयित अकबर हा नाशिक,अहमदनगर, नागपूर यासह सपूर्ण महाराष्ट्रात गांजा पुरवित असल्याचे समोर आले आहे़ अकबरला अटक केल्यानंतर त्यास स्थानिक न्यायालयात हजर करून तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड घेतले होते़ गुन्हे शाखेचे पथक सोमवारी (दि़१८) पहाटे अकबरला घेऊन नाशिकमध्ये आले़ त्याच्या रिमांडची मुदत संपत असल्याने त्यास मंगळवारी (दि़१९) न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ तर याच प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित यतीन शिंदे, सुनील शिंदे आणि सिन्नर येथील संतोष गोळेसर यांची सात दिवसांची कोठडी संपल्याने न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली.
दरम्यान, गांजा तस्करीत अटक करण्यात आलेले संशयित किती दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत़ त्यांच्यामधील बँकेचे व्यवहार तसेच सीडीआर काढून त्याची तपासणी केली जाणार आहे़ या प्रकरणात अनेक मोठे मासे असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़