लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २४ रुग्णांना प्राण गमवावा लागला. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचा आदेश त्यांनी दिला असून, मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.
एका एका रुग्णास सावरण्यासाठी शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाइकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच. या दुर्घटनेस जबाबदार असेल, त्याची गय केली जाणार नाही; पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू? नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे, अशा शब्दांत ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वर्षभरापासून आपण कोरोनाच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणे जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे, असे सांगून ठाकरे यांनी म्हटले आहे की, केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही, तर अशा घटना भविष्यात घडू नयेत, आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे. यापुढे प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजनच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्यऑक्सिजन मिळण्यातील अडचणी तात्काळ दूर झाल्याच पाहिजेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश n कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्त्व आहे, हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय. n ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सूचना दिल्या आहेत. असे असताना हे कसे घडले, n ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी, असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यांची समितीn महापालिकेच्या रुग्णालयात घडलेली दुर्घटना दुर्दैवी असून, ऑक्सिजन टँकरमधून गॅस गळती होत असताना ती थांबविण्यासाठी यंत्रणेने पुरेपूर प्रयत्न केले आहेत. n परंतु अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये, त्याचबरोबर या घटनेचा बोध घेऊन भविष्यात काय करता येईल याच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय सात सदस्यांची समिती गठित केल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
राधाकृष्ण गमे अध्यक्षअशा प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, आरोग्य उपसंचालक पी. डी. गांडाळ, डॉ. प्रमोद गुंजाळ, तांत्रिक तज्ज्ञ प्राचार्य ज्ञानदेव नाठे, आरोग्य अधीक्षक रणजित नलावडे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक संचालक व वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पाटील यांचा त्यात समावेश आहे.
या घटनेच्या अनुषंगाने ऑक्सिजन टाकी बसविलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित, ऑक्सिजन टाकीतील गॅस, त्याचा दाब यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ऑनलाइन व्यवस्था, अशा ठिकाणी चोवीस तास सुरक्षारक्षक नेमणे अशा उपाययोजनांवर आगामी काळात भर देण्यात येणार आहे. - राजेश टोपे, आरोग्यमंत्री
नाशिकच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. या घटनेत दगावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो. मी राज्य सरकार आणि कार्यकर्त्यांना शक्य ते सर्व साहाय्य करावे, असे आवाहन करतो. - राहुल गांधी, काँग्रेस नेते
या दुर्दैवी घटनेत रुग्णांना प्राणांस मुकावे लागले. ही दुर्घटना सद्यस्थितीत वैद्यकीय यंत्रणेसाठी वेदनादायी आणि आव्हाने वाढवणारी आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहवेदना. भावपूर्ण श्रद्धांजली. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन लिक झाल्यामुळे रुग्णांना प्राण गमवावे लागले, ही बाब अतिशय दुर्दैवी व धक्कादायक आहे. मी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते