नाशिक: झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू होत असताना दुसरीकडे नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या गळतीमुळे २२ रुग्णांचे प्राण गेले. यानंतर रुग्णालय परिसरात आक्रोश पाहायला मिळत आहे. मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी दुर्घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.नाशिकमध्ये हाहाकार! ऑक्सिजन गळतीमुळं २२ रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती'माझी मम्मी बरी होत आली होती. फार चांगली होती. जेवण करत होती. अर्ध्या तासापूर्वी ऑक्सिजन संपला. व्हेंटिलेटर बंद झाला आणि ती कोंबडीसारखी फडफडून मेली. कुणी नाही आलं तिच्याजवळ... मरुन गेली ती... फक्त माझी मम्मीच नाही. सगळे मेले... पूर्ण वॉर्डमधील लोक मेले', असं जीवाच्या आकांतानं ओरडून ओरडून एक महिला रुग्णालयाबाहेर सांगत होती. रुग्णालयाबाहेर ऑक्सिजनची गळती झाल्यानं रुग्णालयातील २२ जणांचा अक्षरश: तडफडून मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णालयाबाहेर अक्षरश: आक्रोश आणि हुंदके ऐकू येत आहेत. ऑक्सिजन गळतीनंतर धावाधाव, पाहा डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील फोटोमाणसं गमावलेल्या नातेवाईकांचा आक्रोशऑक्सिजनअभावी आपली आई गमावणाऱ्या तरुणीनं तिचा आक्रोश, संताप व्यक्त केला. 'दोन-दोन दिवस हे लोक वेटिंगवर ठेवतात. हे हॉटेल आहे का की वेटिंगवर ठेवायला? दोन दिवस माझी मम्मी वेटिंगवर होती. तेव्हा हॉस्पिटलने रजिस्ट्रेशन केलं. त्यानंतर त्यांनी अॅडमिट करून घेतलं. त्याआधी दोन दिवस वेटिंगवर राहा, मग आम्ही तुमचं प्रोसिजर करु, असं सांगितलं होतं. जसं आम्ही यांच्याकडे नोकरी मागायला आलो आहोत', अशा शब्दांत तरुणीनं रुग्णालयाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.बेड मिळाला, पण माणसं गेलीनाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं अनेकांना रुग्णालयात बेड मिळत नाही. शहरभर फिरल्यानंतर रुग्णांना कुठेतरी ऑक्सिजन बेड मिळाला. आता आपला रुग्ण हा बरा होऊन घरी येणार, अशी अपेक्षा नातेवाईकांना होती. पण एका दुर्घटनेनं होत्याचं नव्हतं केलं. त्यामुळे नातेवाईक, कुटुंबीयांनी धक्का बसला आहे. संपूर्ण रुग्णालय परिसरात आक्रोश ऐकू येत आहे.नेमकी कशी घडली दुर्घटना?झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये आज सकाळच्या सुमारास मोठ्या ऑक्सिजन टाकीचा कॉक नांदुरुस्त असल्याने त्यातून गळती सुरू झाली. ही गळती रोखण्यासाठी जेव्हा तंत्रज्ञ कारागीर दाखल झाले त्यावेळेस दुरुस्तीचे काम सुरू असताना ऑक्सिजन टाकीचा नादुरुस्त असलेला कॉक पूर्णपणे तुटला. नवीन कॉक बसवून गळती थांबविण्यासाठी २ तासांचा कालावधी लोटला. तोपर्यंत ऑक्सिजन टाकी रिकामी झाली होती. दुपारी २ वाजता पर्यायी टॅंकर पुरविला गेला त्याद्वारे टाकी भरण्यात आली. या २ तासाच्या कालावधीत हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठाचा दाब पूर्णपणे कमी झाला. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण हे एका पाठोपाठ दगावण्यास सुरुवात झाली.
Nashik Oxygen Leakage: ...अन् माझी मम्मी कोंबडीसारखी फडफडून मेली; रुग्णालयाबाहेर लेकीचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 4:22 PM