शासकीय वेळेत कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असतानाही जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती कार्यालयांमध्ये कर्मचारी उशिरा येत असल्याच्या तक्रारींमुळे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या हजेरीपत्रकांची तपासणी सुरू केली आहे. बुधवारी (दि.२०) कार्यालयीन वेळेनंतर येणाऱ्या १४३ कर्मचाऱ्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेऊन समज दिली असतानाही गुरुवारी प्राथमिक शिक्षण विभागातील ४ तर बांधकाम विभागातील १ कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेप्रमाणेच गुरुवारी नाशिक पंचायत समितीला सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे व कनिष्ठ प्रशासन अधिकारी निवृत्ती बगड यांनी पावणे दहा वाजता सुरू केलेल्या तपासणीमध्ये सामान्य प्रशासन विभागातील १२, शिक्षण विभागातील ५, लघु पाटबंधारे विभागातील ५, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील ३, बालकल्याण विभागातील ५, पशुसंवर्धन विभागातील २, आरोग्य विभागातील २ तर ४ कंत्राटी कर्मचारी असे एकूण ३८ कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे आढळून आले. सदर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश गटविकास अधिकारी सारिका बारी यांना दिले आहेत.