- धनंजय वाखारे नाशिक- पक्षातील फुटीनंतर राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची भुजबळ यांच्या येवला या बालेकिल्ल्यात शनिवारी (दि.८) जाहीर सभा होत असतानाच नाशिक-येवला मार्गावर शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील फलकवॉरने आगामी राजकारणातील संघर्षाचे दर्शन घडविले आहे.
शरद पवार यांनी पक्षफुटीनंतर छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यातून पक्षाला नव्याने उभारी देण्याचा संकल्प सोडला आहे. त्यानुसार, शनिवारी शरद पवार यांच्या जाहीर सभेचे येवला येथे आयोजन करण्यात आले. या सभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि भुजबळ समर्थकांनी फलकांच्या माध्यमाद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नाशिक-येवला मार्गावर ठिकठिकाणी उभयतांचे फलक बघायला मिळाले. नाशिक शहरात तपोवनपासून ते मार्गातील चांदोरी, निफाड, विंचूर, देशमाने याठिकाणी शरद पवार यांच्या स्वागताचे तर छगन भुजबळ यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दलचे फलक झळकले आहेत. अनेक ठिकाणी तर अगदी शेजारी-शेजारी खेटून उभयतांचे फलक लावण्यात आले आहेत. निफाड शहरात शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी शरद पवार यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत तर भुजबळ समर्थकांनीही मोठ्या प्रमाणावर फलकबाजी केली आहे.
येवल्यात शिंदे यांचेकडून फलकभुजबळ यांचे कट्टर विरोधक माणिकराव शिंदे यांनी शरद पवार यांच्या स्वागताचे फलक शहरभर लावले आहेत. भुजबळ यांच्या संपर्क कार्यालय व राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाबाहेर भुजबळ यांचेच फलक झळकले आहेत तर दुभाजकावर एक विद्दुत खांबाआड पवार व भुजबळ यांचे फलक लागले आहेत. पवार यांच्या बव्हंशी स्वागत फलकावर एकमेव माणिकराव शिंदे यांचेच नाव व फोटो झळकत आहे.
१५० किलोचा पुष्पहारशरद पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. पवार यांच्या स्वागतासाठी खास १५० किलोचा फुलांचा हार तयार करण्यात आला आहे. सलग २४ तास चार कारागिर हा पुष्पहार घडविण्यात व्यग्र होते.