नाशिक : १० कोटीची खंडणीसाठी नाशिकमधील हेमंत पारख यांचे अपहरण करण्यात आले होते. अपहरण करणाऱ्या बिश्नोई टोळीने दोन कोटी रूपयांची खंडणीवर तडजोड करून सुटका करणाऱ्या अपहरणकर्त्यांपैकी फरार तीघे व ४६ लाखांची उर्वरित रकमेच्या शोधासाठी नाशिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक पुन्हा वाळवंटात गेले आहे.
येथील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे मागील आठवड्यात इंदिरानगरमधील त्यांच्या बंगल्यासमोरून रात्री अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्ते पहाटे पारख यांना सुरतजवळ सोडून बोलेरो जीपमधून फरार झाले होते. अपहरणकर्त्यांचा माग काढण्यात नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाला गेल्या आठवड्यात यश आले होते. तिघांच्या राजस्थानमधील जोधपूर, बिकानेर, फलोदी या जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या गावांमधून मुसक्या बांधल्या. तसेच या कटाचा मास्टरमाइन्ड असलेल्या संशयिताला वाडीवऱ्हेतून पोलिसांनी अटक केली आहे.राजस्थानमधील भारत-पाक सीमेजवळच्या अती दुर्गम अशा गावातून १ कोटी ३३ लाख लाख रुपयांची खंडणीची रक्कमही जप्त केली आहे. उर्वरित रकमेचा संशयितांनी कोठे वापर केला किंवा दडवून ठेवली ती शोधणे आणि या टोळीतील फरार तीघे पोलिसांना हवे आहेत. त्यांची ओळख पटली असून त्यांच्या शोधासाठी गुन्ह्याचे तपासी अधिकारी वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने मरूभूमी गाठली आहे.
पुन्हा पाच दिवसांची वाढीव कोठडी
राजस्थानमधून यापुर्वी अटक केलेले अपहरणकर्ते संशयित आरोपी महेंद्र ऊर्फ नारायणराम बाबूराम बिश्नोई (३०, रा.मोरिया, ता. लोहावत, जि. जोधपूर), पिंटू ऊर्फ देविसिंग बद्रिसी बिश्नोई (२९, रा. राजेंद्रनगर, जि. पाली), रामचंद्र ओमप्रकाश बिश्नोई (२०, रा. फुलसरा छोटा गाव, जि. बिकानेर) आणि अपहरणाचा मास्टरमाइन्ड अनिल भोरू खराटे (२५, रा. लहांगेवाडी, वाडीवऱ्हे) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची पोलिस कोठडी (दि.१५) तारखेला संपली होती; मात्र जिल्हा न्यायालयाने पुन्हा पाच दिवसांची पोलिस कोठडी वाढविली आहे. यांचे तीघे साथीदार अजुनही फरार आहेत.