नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक काल हटवल्यानंतर झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी आज सकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली. अत्यंत चांगला संवाद झाल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले मात्र शहरात विनापरवाना फलकबाजी चालू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक शहरात सध्या राजकीय फलक पुन्हा वाढले आहेत त्यामुळे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी गेल्या आठवड्यामध्ये पोलिसांच्या परवानगीशिवाय आणि फलकवरील मजकूर तपासल्या शिवाय फलक लावता येणार नाही, असा इशारा दिला होता तशी अधिसूचना ही त्यांनी काढलेली आहे. मात्र असे असताना काल राज ठाकरे यांचे नाशिकच्या हॉटेल एसएसके येथे आगमन झाले त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वागताचे फलक लावले होते दुपारी पोलिस आणि महापालिकेच्या पथकाने हे फलक हटवले यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे त्यामुळे तणाव निर्माण झाला होता दरम्यान आज पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली शहरात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पूर्वपरवानगीशिवाय फलक लावता येणार नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र दुसरीकडे फलक हटवल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा याच परिसरात फलक लावले आहे त्यामुळे आज पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.