नामदेव भोर / नाशिक
नाशिक : शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित आणण्यासाठी शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिस दलात भाकरी फिरविली असून, पोलिस उपायुक्त व सहायक आयुक्ताच्या जबाबदाऱ्यांचा खांदेपालट करीत उपआयुक्त मोनिका राऊत यांना मुख्यालयाच्या जबाबदारीतून मुक्त करीत परिमंडळ दोनची जबाबदारी सोपविली आहे, तर परिमंडळ दोनचे उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांना वाहतूक शाखेची जबाबदारी सोपवून मुख्यालयात बसविले आहे.
बोधलेनगर येथे शनिवारी (दि.२२) रात्री तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली असतानाच पोलिस आयुक्तांनी हा खांदेपालट केला आहे. त्यामुळे नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील परिमंडळ दोनमधील उपनगर, नाशिकरोड आणि सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचा उद्रेक झाल्याने या भागातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. यात नाशिक शहर पोलिस आयुक्तांनी उपआयुक्तांसोबत सहायक पोलिस आयुक्तांचाही खांदेपालट केला आहे. यात नाशिकरोड विभागाची जबाबदारी असलेले सहायक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे यांचा कार्यभार पदोन्नतीने नाशिकमध्ये आलेले विशेष शाखेचे सहायक पोलिस आयुक्त आनंदा वाघ यांना सोपविण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आदेशित नवीन नेमणुकीच्या ठिकाणी पदभार स्वीकारण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केल्या आहेत.