नाशिक : राज्यात सत्ताधारी पक्ष व विरोधी गटातील नेत्यांकडून होणारे आरोप-प्रत्यारोप तसेच सोशलमिडियावरील अफवा विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी आषाढी एकादशी, बकरी ईदच्या औचित्यावर शहराचे पोलिस आयुकत अंकुश शिंदे यांनी मनाई आदेश लागू केला केला आहे. बुधवारपासून (दि.१४) २९ जूनपर्यंत मनाई आदेश कायम राहणार आहे.
आगामी सण-उत्सव काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कुठल्याहीप्रकारचा तणाव व जातीय सलोखा बिघडू नये, यासाठी शहर पोलिस प्रशासनाकडून अधिकाधिक खबरदारी घेतली जात आहे. सोशलमिडियावरील हालचालींवर सायबर सेलद्वारे ‘सायबर पेट्रोलिंग’ करत सुक्ष्म लक्ष ठेवले जात आहे. अंकुश शिंदे यांनी मनाई आदेश जारी केला असून या आदेशाचे उल्लंघन करणे संबंधितांना चांगलेच महागात पडू शकते.या आदेशानुसार शहरात दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, दगड, शस्त्रे, अस्त्रे, गावठी कट्टा, तलवार, दांडे, काठ्या आणि अन्य प्राणघातक हत्यारे आणि वस्तू बाळगता येणार नाहीत. कोणत्याही छायाचित्राचे, प्रतीकात्मक पुतळ्यांचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करता येणार नाही. अर्वाच्च घोषणा, आवेशपूर्ण भाषण करता येणार नाही. विविध प्रकारचे वाद्य वाजविणे, महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके वाजविणे, घंटानाद करणे, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी किंवा चिथावणीखोर वक्तव्ये करणे, सोशलमिडियावर कोणाच्याही भावना दुखावणारे वक्तव्य करणे आदी बाबींनाही मज्जाव करण्यात आला आहे. पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय कुठेही कोणतीही सभा किंवा मिरवणूक काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, अंत्ययात्रा, सिनेमागृहांसाठी लागू नसणार आहे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.