संदीप झिरवाळ
नाशिक - गेल्या आठवड्यात आडगाव हद्दीतील शिलापूर येथे भरदिवसा एका घरातून लाखो रुपयांची रोकड व सोन्याचांदीचे दागिने असा आठ लाख रुपयांचा ऐवज चोरून घरफोडी करणाऱ्या घरफोडी टोळीतील अट्टल गुन्हेगार व पश्चिम महाराष्ट्रात तब्बल १५पेक्षा अधिक घरफोडी, चोरी, दरोडा गुन्हे दाखल असलेल्या सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले (२८) याला आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अहमदनगर जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या आहेत. गेले चार दिवस आडगाव पोलिसांनी अहमदनगरला तळ ठोकून होते.
गेल्या आठवड्यात शिलापूर येथे राहणाऱ्या अक्षय रंगनाथ कहांडळ यांच्या घरात दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी प्रवेश करत घरातील कपाट व कोठीतून लाखो रुपयांची रोकड व साडे बारा तोळे सोन्याचांदीचे दागिने असा आठ लाख रुपयांचा ऐवज चोरून घरफोडी केली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांनी तत्काळ गुन्हा शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अशोक पाथरे व कर्मचाऱ्यांना सूचना देत शोधकार्य सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आडगाव पोलिसांनी मानवी कौशल्य तंत्रज्ञान वापर करून माहिती घेतली असता घरफोडीचे कनेक्शन अहमदनगर जिल्ह्यात असल्याचा सुगावा लागला.
संशयित सराईत गुन्हेगार सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले याचे दोघे भाऊ संशयित मिनल ईश्वर भोसले, संदीप ईश्वर भोसले यांचा पोलिस शोध घेत आहेत. अखेर आडगाव पोलिसांच्या पथकाला यश आले. घरफोडीच्या घटनेतील बोटांचे ठसे जुळल्याने चार दिवसांपासून पोलिस उपनिरीक्षक अशोक पाथरे, विलास चारोस्कर, निखिल वाघचौरे, दिनेश गुंबाडे, निलेश काटकर, पप्पू वाघ यांचे पथक नगर जिल्ह्यात चोरांच्या माग काढत पाठलाग करत होते. सोन्या हा येथील एका जंगलात लपून बसला होता.