नाशिक : बिऱ्हाड डोक्यावर घेऊन कच्च्याबच्यांसह आपले मूळ गाव गाठण्यासाठी लॉकडाउन काळातसुद्धा परप्रांतीय मजुरांचे स्थलांतर सुरूच आहे. अशाचप्रकारे शंभराहून जास्त मजूर उड्डाणपुलावरून पुढे सरकत असताना त्याची कुणकुण पोलिसांना लागल्याने गुरुवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास मुंबईनाका पोलिसांनी तत्काळ उड्डाण पुलावरून मार्गस्थ होत असलेल्या मजुरांना रोखले असून, ताब्यात घेतलेल्या सर्व स्थलांतरितांची आनंदवली भागातील निवारागृहात रवानगी करण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये रोजगार बुडाला आहे. सरकारकडून जरी मजुरांची निवास, भोजनाची हमी घेतली जात असली तरीदेखील मजुरांना आपल्या मूळ घराची लागलेली ओढ शांत बसू देत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. नाशिकमध्ये यापूर्वीही मोठ्या संख्येने अशा मजुरांना रोखले गेले आहे. मुंबईनाका भागातील उड्डाण पुलावर यातील सुमारे शंभर नागरिकांना पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखले. अचानक उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तेथे धाव घेतली. महिला, पुरुष आणि मुले त्यांना दिसून आली. या सर्वांना सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करत उड्डाणपुलावर पोलिसांनी रोखले. या नागरिकांकडे प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यात या नागरिकांनी आपले मूळ गाव उत्तर भारतात असल्याचे सांगितले. यात काही महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. राज्य सरकारच्या आदेशानुसार या नागरिकांचा प्रवास पुढे सुरू ठेवता येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी या सर्व नागरिकांची रवानगी गंगापूररोडवरील आनंदवली भागातील महापालिकेच्या शेल्टर होममध्ये केली आहे. या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या जेवणाची सोयही प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये आतापर्यंत आठशेपेक्षा अधिक पायी व वाहनातून अनधिकृ त प्रवास करणाऱ्या नागरिकांना पकडण्यात आले आहे. या नागरिकांना वेगवेगळ्या निवारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात ठेवण्यात आलेल्या नागरिकांपैकी एक करोनाग्रस्त आढळून आला आहे. दररोज शेकडो नागरिक मजल दरमजल करत कित्येक मैल अंतर रणरणत्या उन्हात आपला जीव धोक्यात घालत आहेत.
नाशिक पोलिसांनी रोखला परप्रांतीय मजुरांचा पायी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 9:10 PM
शंभराहून जास्त मजूर उड्डाणपुलावरून पुढे सरकत असताना त्याची कुणकुण पोलिसांना लागल्याने मुंबईनाका पोलिसांनी तत्काळ उड्डाण पुलावरून मार्गस्थ होत असलेल्या मजुरांना रोखले असून, ताब्यात घेतलेल्या सर्व स्थलांतरितांची आनंदवली भागातील निवारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
ठळक मुद्देकोरोनामुळे बेघर मजुरांचे स्थलांतर बेरोजगारीमुळे निवडला परतण्याचा पर्यायगावाच्या ओढीने मजल दरमजल पायी प्रवास