नाशिक- राज्यातील सरकार स्थापनेसाठी सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्टÑवादीचे आमदार सभागृहात फुटू नये यासाठी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या पध्दतीचे दबावतंत्र वापरले असून आमदार सरोज आहिरे यांच्या कुटूंबियांशी चर्चा करून पक्षाबरोबरच राहा असे सांगण्यात आले आहे.
राज्यात सत्ता स्थापनेच्या अनेक घडामोडी सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी (दि.२७) बहुमत सिध्द करावे लागणार आहे. त्यामुळे सध्या एकत्र असले तरी सभागृहात ऐनवेळी पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊ नये यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या घरासमोर आजच जाऊन निदर्शने करण्याचे पक्षाच्या वतीने जाहिर करण्यात आले होते. त्यानुसार देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात येणार होती. परंतु वेळेपूर्वीच राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटूबियांची भेट घेतली तसेच पक्षाचे नेते शरद पवार यांच्या मुळेच त्या निवडून आल्या आहेत आणि आता त्यांनी सभागृहात पक्षादेशाचे पालन करावे असे त्यांच्या कुटूबियांना बजावले. विशेष म्हणजे आमदार सरोज अहिरे या मुंबईत पक्षाच्या बरोबर असताना देखील अशाप्रकारे कुटूंबियांना भेटणे एक प्रकारचे दबावतंत्र असल्याच मानले जात आहे.
दरम्यान, या घटनेच्या दरम्यानच भाजप बरोबर सत्ता स्थापनेसाठी गेलेले राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आल्यानंतर मात्र, आंदोलने स्थगित करण्यात आली.