नाशिक : पत्नी घटस्फोट देत नाहीत म्हणून ती जिवंत असताना नाशिकच्या रामकुंडावर तिचे श्राद्ध घालणाºया मुंबईच्या वास्तव फाउंडेशनचा मंगळवारी (दि.९) नाशिकच्या लोकनिर्णय संस्थेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले असून, महिलांना अशाप्रकारची वागणूक देणा-या पुरुषांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. विशेष म्हणजे परिसरातील पुरोहित आणि केशकर्तन व्यावसायिकांनीदेखील आंदोलनाला पाठिंबा दिला.
महिलांप्रमाणेच पुरुषांचा हक्क मानणा-या संघटनादेखील स्थापन होत असून, मुंबईतील वास्तव या संस्थेच्या वतीने पत्नी पीडित पुरुषांसाठी अभिनव आंदोलन करण्यात आले. या पुरुषांना त्यांची पत्नी घटस्फोट देत नसल्याने त्यांनी रविवारी (दि.७) रामकुंडावर जिवंत पत्नीचे पिंडदान केले. त्याला पुरोहित वर्गाने विरोधही केला होता. दरम्यान, लोकनिर्णय या संस्थेच्या वतीने पत्नीचे पिंडदान करणाºया पुरुषांचे अभिनव निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पोस्टरच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्यात आला. येथील नाभिक समाजाच्या प्रतिनिधींनी पिंडदान आंदोलन चुकीचे असून, कुणीही त्यांचे मुंडन केलेले नाही असे सांगून महात्मा फुले यांच्या न्हाव्यांच्या संपाची आठवण सांगितली, तर पुरोहितांनीही पुरुषांचे पिंडदान करणे चुकीचे असून, त्याला विरोध दर्शवला.
यावेळी आंदोलन अन् प्रबोधन संवाद एकूण सहा ठिकाणी करण्यात आले. याप्रसंगी संगीता कुमावत, नंदा पवार , कमल मते, वैशाली पवार, भारती मांडोरे, सोनी कुमावत, राहुल बोरीचा, राणी शिंदे, संतोष जाधव, मधुकर सहाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.