नाशिक : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहविभागामार्फत पोलीस दलातील उत्कृष्ठ कामगिरीसाठीचे पदक जाहीर करण्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्रातील 41 जणांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस पदक जाहिर झाले असून त्यात नाशिक ग्रामीण पोलीस दलातील दोघांचा समावेश आहे. पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ मंगळु भरसट व सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय तुकाराम उगलमुगले अशी दोघा पोलिसांची नावे आहेत.
नाशिक ग्रामीण पोलीस दलात दहशतवाद विरोधी कक्षामध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ भरसट यांना विशेष पोलीस पदक जाहीर झाले आहे. हरसुल तालुक्यातील हरणटेकडी येथील रहिवाशी असलेले भरसट हे 22 ऑगस्ट 1989 रोजी नाशिक ग्रामीणमध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. त्यानंतर ते कळवण, हरसुल, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, अभोणा आणि पेठ पोलीस ठाण्यामध्ये सेवा बजावली आहे. 2013 मध्ये झालेल्या पोलीस खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले होते. त्यांना सेवाकाळात 150 रिवॉर्ड मिळाले आहेत. आदिवासी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना विशेष पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उगलमुगले यांना देखील पोलीस पदक जाहीर झाले आहे. दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील रहिवाशी असलेले उगलमुगले मार्च 1989 रोजी नाशिक ग्रामीण पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले होते. 1989 ते 2004 पर्यंत ते विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात सेवा बजावली. त्यानंतर नाशिक तालुका पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हेशाखा आणि सध्या वाचक शाखेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 480 रिवॉर्ड मिळवले आहेत.