उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावर नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत दोन्ही बाजूला रस्त्याच्या मधोमध उभे असलेले मोठमोठे वृक्ष अपघाताला निमंत्रण व वाहतुकीला अडथळा करणारे ठरत आहेत. यामुळे वाहनधारकांच्या दृष्टीने या मार्गावरील प्रवास धोक्याचा ठरत आहे.नाशिक-पुणे महामार्गावर पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात छोट्या-मोठ्या व अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत झालेली असून, हजारोंच्या संख्येने नागरिक राहण्यास आलेले आहेत. त्यामुळे नागरिक, महिला, विद्यार्थी, कामगार यांची मोठ्या प्रमाणात महामार्गावरून ये-जा सुरू असते. कुंभमेळ्याच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून द्वारका ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंतचा रस्ता सहापदरी करण्याचे नियोजित होते. मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने व इतर तांत्रिक अडचणीमुळे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. रुंदीकरणाऐवजी नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूने तीन ते चार फुटाचे डांबरीकरण करून रस्ता वाढविण्यात आला. यामुळे झाडे आता रस्त्याच्या मधोमध आली आहेत. त्यामुळे महामार्गाचे नावापुरते रुंदीकरण करूनदेखील वाहनधारकांच्या दृष्टीने काहीएक फायद्याचे झालेले नाही. उलटपक्षी ते वाहनधारकांच्या दृष्टीने धोक्याचे ठरत आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्याच्या मधोमध आलेली झाडे अपघाताला निमंत्रण व वाहतुकीला अडथळा ठरत आहे. पर्यावरणाच्या नावाखाली व वृक्षप्रेमींच्या विरोधामुळे रस्त्याच्या मधोमध उभे असलेल्या धोकेदायक वृक्षांकडे शासन, मनपा, सार्वजनिक बांधकाम कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. त्याचा सर्व त्रास सर्वसामान्य वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक अपघात होत असून, निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. तर काही जणांना गंभीर दुखापत होऊन अपंगत्व आले आहे. धोकेदायक रस्ता दुभाजकयाच परिसरातील रस्ता दुभाजकाचे कामदेखील अर्धवट स्थितीत झालेले आहे. रंगरंगोटी, सूचनाफलक न लावल्याने वाहनधारकांचा गोंधळ उडतो. वाहनांच्या धुरामुळे व उडणाऱ्या धुळीमुळे काळेकुट्ट झालेले गतिरोधक रात्रीच्या अंधारात दिसत नसल्याने उपनगर नाका, गांधीनगर, डीजीपीनगर या ठिकाणी दिवसाआड वाहनांना अपघात होऊन नुकसान होत आहे. वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता रस्त्याच्या मध्येच उभे असलेले जुने वृक्ष तोडण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच रस्ता दुभाजकांना रंगंरगोटी व सूचनाफलक लावण्याची मागणी रहिवासी, वाहनधारकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
नाशिक-पुणे महामार्ग धोकादायक
By admin | Published: November 26, 2015 10:27 PM