- धनंजय रिसोडकर नाशिक : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची मान्यता नसलेल्या व मुदत बाह्य बियाण्यांबाबत कठोर कारवाई करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसारच जिल्ह्यातील कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा मारुन द्वारका परिसरातील अभिजीत सीडस प्रा. लि. या बियाणे कंपनीत मान्यता नसलेला तसेच मुदत बाह्य कांदा पिकाचे सुमारे ५०० ग्रॅमचे ८८५ पाकिटे (४४२.५ किलो बियाणे) जप्त केले. जप्त केलेल्या बियाण्याची किंमत सुमारे १३ लाख ७ हजार ६८० रुपये एवढी आहे.
जिल्ह्यातील कृषी विभागाच्या भरारी पथकाने तपासणीच्या वेळेस या बियाणे विक्रीकरिता पॅकिंग करीत असल्याचे आढळले . कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांच्या नेतृत्वात जिल्हा भरारी पथकातील कृषी उपसंचालक जगदीश पाटील , तंत्र अधिकारी संजय शेवाळे, मोहीम अधिकारी अभिजीत जमधडे, तंत्र अधिकारी अभिजीत घुमरे, नितेंद्र पाणपाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकजगन सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक येथे मोहिम अधिकारी अभिजीत जमधडे यांच्या द्वारे गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.