- संजय पाठकनाशिक - आगामी लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन महायुतीला जोडणार की एकटेच धावणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्क लढवले जात आहेत. येत्या ९ मार्च राेजी मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार असून त्या निमित्ताने नाशिकमध्ये होणाऱ्या सभेत राज ठाकरे याबाबत भूमिका स्पष्ट करणार आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे नाशिकमध्ये आल्यानंतर ते ८ मार्च रोजीच श्री काळाराम मंदिरात जाऊन आरतीही करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
मध्यंतरी राज ठाकरे हे त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांच्या समवेत जाणार, अशी चर्चा होती. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे महाअधिवेशन झाले त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी मनसेला महाविकास आघाडीत येण्याबाबत निमंत्रण देणार काय, या प्रश्नावर उत्तर देताना ज्यांना भाजपाचा पराभव व्हावा असे वाटते त्यांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे, असे सांगून थेट उत्तर देणे टाळले होते. त्यानंतर महायुतीबाबत देखील अशाच चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे आता नाशिकमधील वर्धापन दिनाच्या सभेतच राज ठाकरे भूमिकास्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन येत्या ९ मार्चला होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे हे ७ मार्च रोजी सायंकाळी नाशिकला येणार आहेत. ८ मार्चला राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, चर्चा, बैठका होतील, तर ९ मार्चला सकाळी साडेअकरा वाजता भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात त्यांची सभा होईल.