नाशिक (सुयोग जोशी) : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे आयोजित स्वच्छ वायु सर्वेक्षण-२०२३ (किंवा स्वच्छ हवा सर्वेक्षण) मध्ये मध्य प्रदेशचे इंदूरच्या माहिती तंत्रज्ञान केंद्राला प्रथम क्रमांक प्रदान केला. आग्रा आणि ठाणे अनुक्रमे दुसर्या व तिसर्या स्थानावर तर नाशिकचा देशात २१ वा तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक आला. नाशिकला २०० पैकी १६०.३ गुण मिळाले.
२०२६ पर्यंत वायू प्रदूषण ४० टक्यांपर्यंत कमी करण्यासाठी एन कॅप कार्यक्रमांतर्गत शहर-विशिष्ट कृती योजनांच्या अंमलबजावणीसाठी एकूण १३१ शहरांची निवड करण्यात आली होती. या शहरांच्या सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. राज्यातील मुंबई व नागपूरनंतर नाशिकचा २१ वा क्रमांक राहिला आहे. या सर्व्हेक्षणाच्या तीन श्रेणी करण्यात आल्या आहेत. त्यात प्रथम श्रेणी अंतर्गत (दशलाखापेक्षा जास्त लोकसंख्या) इंदूर शहर प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर आग्रा आणि ठाणे आहे. दुसर्या श्रेणीत (३-१० लाख लोकसंख्या) अमरावतीने प्रथम क्रमांक मिळवला, त्यानंतर मुरादाबाद आणि गुंटूरचा क्रमांक लागतो. त्याचप्रमाणे, तिसर्या श्रेणीसाठी (३ लाखांपेक्षा कमी लोकसंख्या) परवानू (हिमाचल प्रदेश) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, त्यानंतर कलाअंब आणि अंगुल यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेसाठीच्या चौथा आंतरराष्ट्रीय दिवस (स्वच्छ वायु दिवस २०२३) या जागतिक संकल्पनेला सक्षम करण्यासाठी देशभरातील १३१ शहरांचा सहभाग करण्यात आला होता. त्यातून जनसामान्यांचा सहभाग निर्माण करणे, गुंतवणूक वाढवणे आणि वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा उद्देश ठेवण्यात आला होता. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय व राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम (एनकॅप) राष्ट्रीय स्तरावरील हा उपक्रम राबवत आहेत. ज्यामध्ये भारतातील शहर आणि प्रादेशिक स्तरावरील वायू प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी कृतीं आराखडा देण्यात आलेला आहे.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न
एनकॅपच्या सर्व भागधारकांचा सहभाग आणि आवश्यक कार्यवाही सुनिश्चित करून वायू प्रदूषणावर नियोजनपध्दतीने मात करणे हेे उद्दिष्ट ठेवले आहे. २०२६ पर्यंत वायू प्रदूषण ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत शहर-विशिष्ट कृती योजनांच्या अंमलबजावणी करण्यासाठी एकूण १३१ शहरांची निवड करण्यांत आली होती.
एनकॅप उपक्रमासाठी देशपातळीवर निवडलेल्या १३१ शहरातील हवा शुध्द करण्यासाठी उपाय योजना सुचविण्यात आल्या होत्या. त्यात राष्ट्रीय-स्तरीय कृती योजना, राज्य-स्तरीय कृती योजना आणि शहर-स्तरीय कृती योजना तयार करणे आणि अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर या शहरांना कृती आराखडा देण्यात आला होता. त्यानुसार केलेल्या सर्व्हेक्षणाचा निकाल सादर करण्यात आला. त्यात पहिल्या २५ शहरांमध्ये राज्यातील ठाणे मुंबई नागपूरसह नाशिकचा समावेश आहे.
नाशिक महापालिकेची प्रगतीच आहे. गेल्यावर्षी १३८ गुुण होते, यावर्षी १६० गुण मिळाले आहेत. यांत्रिकी झाडू आल्यानंतर पुढच्या वर्षी अधिक गुण मिळतील.-विजयकुमार मुंडे, उपायुक्त, पर्यावरण व गोदा सवंर्धन