नाशिक- केंद्र शासनाच्या केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाकडून वर्षभरापूर्वी घेण्यात आलेल्या राहाण्यायोग्य शहरांच्या सर्वेक्षणात नाशिकचा क्रमांक ३८ वा आला आहे. तर महापालिकेच्या कार्यक्षमतेच्या सर्वेक्षणात नाशिक ३२ व्या स्थानावर आहेत.केंद्र शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देशात बंगलोर पहिल्या नंबरवर असून पुण्याचा दुसरा क्रमांक आहे. दहा लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचे हे सर्वेक्षण होते. नाशिकचा नंबर मात्र ३८ वा आहे. तर महापालिकेच्या कार्यक्षमतेत इंदूरने बाजी मारली आहे. देशात चौथ्या क्रमांकावर राज्यातील पिंप्री चिंचवड महापालिका आहे तर नाशिक त्या तुलनेत मागे असून ३२ व्या स्थानावर आहे.केंद्र शासनाच्या वतीने २०१९ मध्ये अशाप्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात नाशिकमध्येच स्मार्ट सिटीच्या वतीने सहभागाचे आवाहन करण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा संबंध केवळ महापालिकेशी संंबंधित नसून कायदा व सुव्यस्था, पर्यावरण, सुरक्षिता, रोजगार अशा अनेक बाबींशी संबंधित आहे. सर्वेक्षणात संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक, भौतिक सुविधा असे प्रमुख चार निकष होते, त्याच प्रमाणे शैक्षणिक, सांस्कृतीक, आरोग्य, रोजगार निर्मिती, वाहतूक, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, अशा विविध निकषांवर काटेकोर तपासणी करण्यात येते. तसेच सर्वेक्षणाशिवाय नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून नंतर ही क्रमवारी जाहीर करण्यात येते. त्यानुसार ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.मुंबई-पुण्याजवळ असलेले सुवर्ण त्रिकोणातील शहर म्हणून नाशिकचा लौकिक आहे. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील नाशिकला मान्यता आहे. औद्योगिक विकासाबरोबरच रस्ते, रेल्वे आणि हवाई जोडणीमुळे नाशिकच्या शहराचा रिच वाढला आहे. त्या तुलनेत अपेक्षित क्रमांक मात्र मिळालेला नाही.सुधारणा करण्यात येईलकेंद्र शासनाच्या सर्वेक्षणात अनेक मुद्यांचा समावेश होता. येथील पायाभूत सुविधा सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था, ग्रीन बिल्डिंग, रोजगार असे अनेक मुद्दे होते. त्यात नाशिकची उणीव नक्की कशात आहे, याची चिकित्सा स्मार्ट सिटी कंपनी करीत आहे. त्यानुसार अहवाल तयार करून तो संबंधित विभागांना पाठवून अधिक सुधारणा करण्यात येईल.- प्रकाश थवील, सीईओ, नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीदेशपातळीवर ३८ वा क्रमांक येणे ही बाब चांगली असली तरी नाशिकचे एकंदर स्थान आणि येथील सुविधा बघता या शहराचा क्रमांक टॉप टेन मध्ये कसा येईल यासाठी नक्कीच अभ्यास करून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. स्वच्छ शहर सर्वेक्षणात ज्या पध्दतीने नाशिकने गेल्या वर्षी भरारी घेतली, त्याच पध्दतीने नजीकच्या काळात आता यापेक्षा चांगली कामगिरी करण्यावर भर दिला जाईल.- सतीश कुलकर्णी, महापौर.