नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी पावणेदोनशेहून अधिक इच्छुकांनी दावेदारी केल्यामुळे भारतीय जनता पक्षाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरांची चिंता भेडसावू लागली आहे. शिवसेनेबरोबर युती न करता निवडणूक लढविली तरी, भाजपमध्ये भरमसाठ इच्छुकांमुळे बंडखोरी अटळ मानली जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे विधानसभेसाठी इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या असून, फक्त पक्षाने उमेदवारी दिल्यास विजय आपसूकच सुकर होईल अशी भावना इच्छुकांमध्ये आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जिल्ह्यातील पंधराही जागांवर उमेदवार उभे केले होते. पैकी अवघ्या चार जागा जिंकल्या. पाच वर्षांत भाजपने ग्रामीण भागात पाळेमुळे घट्ट केल्याचे दोन दिवसांपूर्वी पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान दिसून आले. पंधरा मतदारसंघांत सुमारे पावणेदोनशेहून अधिक इच्छुकांनी तयारी दर्शविली. मुलाखती देणाऱ्या इच्छुकांमध्ये एकेका घरातील दोन-दोन व्यक्तींनीही उमेदवारीची मागणी केली, तर शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघावरही भाजपच्या इच्छुकांनी मुलाखती देऊन एक प्रकारे दावा केला आहे. विद्यमान आमदारांपुढेही या इच्छुकांनी आव्हान उभे केले आहे.
दिवसभर चाललेल्या या मुलाखतींमुळे भाजपचे कार्यालय पाच वर्षांत पहिल्यांदा गजबल्याचे पाहून पक्षाचे स्थानिक नेते व निरीक्षकांना हायसे वाटले असले तरी, इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या शिडात विधानसभेची हवा भरल्यामुळे हा प्रयोग अंगलट येण्याची भीतीही आता व्यक्त होऊ लागली आहे. जागावाटपाबाबत शिवसेनेशी अद्याप चर्चा बाकी आहे. अशात इच्छुकांना निवडणुकीच्या तयारीसाठी प्रोत्साहन देण्याच्या भाजपच्या या प्रयत्नांतून पुढे बंडखोरीची बिजे रोवली गेल्याचे बोलले जात आहे.