नाशिक : कोरानाबाधितांची वाढती संख्या कमी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिनांक १२ ते २३ मे या बारा दिवसांत कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिका आणि पोलीस यंत्रणेने नागरिकांंवर कारवाईचा धडका लावला. या कालावधीत सुमारे २१ लाख रूपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाने कहर केला होता. मे महिन्यात ही संख्या कमी होऊ लागली असली, तरी पुन्हा संसर्ग वाढू नये आणि तिसऱ्या संभाव्य लाटेची तयारी करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी दिनांक १२ मेपासून २३ मेच्या रात्री बारा वाजेपर्यंत कडक निर्बंध शहर आणि जिल्हा पातळीवर लागू करण्यात आले होते. त्यानंतर निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी दंडशक्तीचा वापर करण्यात आला. आरोग्य नियमांचे पालन करण्यासाठी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती, परंतु त्याचबरोबर नियमबाह्य पद्धतीने आस्थापना सुरू करणारे तसेच फिजिकल डिन्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरात दिनांक १२ ते २२ मेपर्यंत महापालिका आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईतून सुमारे २१ लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई केली खरी परंतु त्यापेक्षा अधिक कारवाई पोलीस यंत्रणेने केली आहे. यात १२ मे रोजी मास्क न वापरणाऱ्या १५७ जणांकडून ८१ हजार ५०० रुपये तर फिजिकल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १७२ जणांकडून १ लाख ८२ हजार ५०० रूपये याप्रमाणे २२ मे रोजी मास्क न लावणाऱ्या १,६२६ नागरिकांकडून ७ लाख ९६ हजार रूपये दंडाची वसुली पोलिसांनी केली आहे. तर फिजिकल डिस्टन्सिंग आणि दुकाने उघडण्यासारख्या अन्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ हजार ७१७ नागरिकांकडून १२ लाख २८ हजार ५०० रूपयांंचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तुलनेत महापालिकेची दंडवसुली कमी असून, मास्क न लावल्याबद्दल २४६ नागरिकांकडून १ लाख २३ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
इन्फो...
पाेलिसांची दंड वसुली
मास्क न लावल्याबद्दल एकूण १,६२७ नागरिकांकडून ७ लाख ९६ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे तर फिजिकल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ लाख २८ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेने त्या तुलनेत मास्क न लावणाऱ्यांकडून १ लाख २३ हजार रूपये आणि फिजिकल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ जणांकडून ४९ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.
इन्फो..
महापालिकेने या अकरा दिवसात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या चारजणांकडून चार हजार रूपये दंड वसूल केला आहे. मात्र, एकूणच कडक निर्बंधांचे पालन करण्यासाठी पोलिसांच्या तुलनेत नाशिक महापालिकेची कामगिरी कमीच राहिली आहे.