नाशिक : रस्ते सुरक्षा हा विषय इतका महत्त्वाचा असूनही वाहनचालक याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. परिणामी शहरात रस्ते अपघातांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. गाडी चालविताना मोबाइलचा केला जाणारा वापर तर थेट मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे; मात्र तरीही याकडे कानाडोळा केला जातो हे विशेष! चालू वर्षी जूनअखेरपर्यंत सुमारे १२ लाख रुपयांचा दंड केवळ गाडी चालविताना मोबाइलचा वापर केल्यामुळे पोलिसांनी केला आहे.
मोबाइलवर बोलण्याच्या नादात अनेकदा लक्ष विचलित होऊन वाहनांची धडक होऊन दुर्घटना घडण्याचे प्रकार दररोज शहरातील विविध रस्त्यांवर पाहावयास मिळतात.
---
ब्रेथ अॅनालायझरचा वापर सुरू होईना
मद्यप्राशन केले आहे किंवा नाही, हे ओळखण्याकरिता कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांकडून वेळोवेळी ‘ब्रेथ अॅनालायझर’ यंत्राचा वापर कोरोनापूर्वी केला जात होता; मात्र मागील वर्षी कोरोनाने एन्ट्री करताच हा वापर थांबला अन् मद्यपी वाहनचालक ओळखायचे तरी कसे, असा प्रश्न आता पोलिसांपुढे उभा राहिला. कारण, आता बहुतांश मद्यपींकडून वाहन चालविताना मास्कचाही आधार घेतला जातो. आयुक्तालयाकडील एकूण ९५ ब्रेथ अॅनालायझर मागील दोन वर्षभरापासून धूळखात पडले आहेत.
----
हेल्मेट नसल्याने ९३ जणांचा मृत्यू
१ सर सलामत तो पगडी पचास, अशी हिंदीतील एक म्हण आहे. डोके शाबूत राहिले तर कित्येकदा पगडी घालता येऊ शकते, असा त्याचा सरळ अर्थ निघतो. शिराचे महत्त्वही अधोरेखित होते.
२ हेल्मेटचा कंटाळा करणाऱ्यांची संख्या शहरात कमी नाही. मागील वर्षी शहरात दुचाकी अपघातात १०४ व्यक्तींचा बळी गेला. यापैकी ९३ दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर केलेला नव्हता, असे आढळून आले.
३ हेल्मेट शिरावर नव्हे, तर दुचाकींच्या आरशावर किंवा पाठीमागे लटकविल्याचे चित्र पाहावयास मिळते. हेल्मेटसोबत असल्याचा हा देखावा जिवावरही बेतणारा ठरू शकतो.
-----
आलेख
या वर्षात केलेला दंड
विना हेल्मेट - 76,04,000
सिग्नल न पाळणे - 1,73,600
ओव्हर स्पीड - 1,77000
मोबाइलवर बोलणे - 11,93,500
म्युझिकल हॉर्न- 11,500
----
आलेख
2020 साली झालेले अपघात
अपघात 152
जखमी 188
मृत्यू 85
दुचाकी- 323
चारचाकी - 124
तीनचाकी - 19
............