लॉकडाऊन घोषित होताच २५ मार्च ते २३ डिसेंबर २०२० पर्यंत शहर वाहतूक शाखेकडून लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करण्यावर विशेष भर दिला गेला होता. या काळात अत्यावश्यक सेवा किंवा आपत्कालीन वैद्यकीय कारणांव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कामासाठी घराबाहेर पडण्यावर निर्बंध लावण्यात आले होते. दरम्यानच्या काळात हुल्लडबाजी करत दुचाकींवरुन मिरविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. यावेळी डिसेंबर अखेरपर्यंत एकूण ६ कोटी ९९ लाख ५५ हजार ७५० रुपयांचा दंड वाहतूक शाखेकडून केला गेला. यापैकी आतापर्यंत सुमारे ९८ लाख ६० हजार १५० रुपयांचा दंड वसूल करण्यास पोलिसांना यश आले आहे. उर्वरित दंडाची रक्कम अद्याप थकीत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात सर्वत्र मास्कचा वापर बंधनकारक तेव्हाही करण्यात आला होता आणि आजही करण्यात आला आहे. सध्या शहर पोलिसांकडून मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात नसली तरी मागील वर्षी मात्र मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावरताना आढळून आल्यास थेट अदखलपात्र गुन्हे (एन.सी) दाखल केले जात होते. अशा प्रकारे सुमारे १९ हजार ९७२ लोकांवर गुन्हे दाखल केले गेले तर सहा लोकांवर एफआयआर नोंदविण्यात आला.
----इन्फो---
राज्य पोलीस कायद्यानुसार अशी झाली कारवाई
लोकांपासून सुरक्षित अंतर न राखणे तसेच सार्वजनिक ठिकाणी बेशिस्तपणे वर्तन करताना आढळून आलेल्या ३४६ लोकांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०/११७ नुसार पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. तसेच दुकानांसमोर सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष करणे, गर्दी होऊ दिल्याप्रकरणी २४४ लोकांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध २ हजार ६५२ लोकांवर याप्रमाणे कारवाई झाली होती. तसेच कलम ११५/११७ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या सुमारे २०७ थुंकीबहाद्दरांना कारवाईचा दणका देण्यात आला होता.
---- पाॅइंटर्स---
दाखल गुन्हे - ३९,१४२
विनामास्क कारवाई- २२,६३०