राज्यातील पहिले गिधाड प्रजनन केंद्र नाशकात
गिधाड संवर्धनासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पंचवार्षिक धोरणात्मक कृती आराखड्यात देशभरात नव्याने पाच ‘गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रे’ स्थापन केली जाणार आहेत. यापैकी एकमेव केंद्र राज्यातील नाशिकमध्ये होणार आहे. त्यासाठी एकूण ४० कोटींची आर्थिक तरतूददेखील केंद्राच्या वन-पर्यावरण मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
(फोटो आर वर ३१वल्चर नावाने)
---
‘ट्रान्सिट ट्रिटमेंट सेंटर’ला मिळणार मुहूर्त
जखमी वन्य प्राण्यांवर उपचार करण्यासाठी ‘ट्रान्सिट ट्रिटमेंट सेंटर’च्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे वन विभागाने निधी मागितला आहे. त्यामुळे या नववर्षात या सेंटरची उभारणी म्हसरुळ येथील वन विभागाच्या डेपोच्या जागेत केली जाईल. त्यासाठी नाशिक पश्चिम वन विभागाकडून यासंदर्भात पाठपुरावा सातत्याने सुरू आहे.
---
रेस्क्यू वाहनाचे होईल आगमन
जखमी वन्य प्राण्यांना रेस्क्यू करण्यासाठी वन्य प्राणी रुग्णवाहिका, तसेच रेस्क्यू टीमला तत्काळ घटनास्थळी पोहोचता यावे, यासाठी स्वतंत्र वाहन नाशिक पश्चिम वन विभागाच्या ताफ्यात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी वन विभागाकडून शासनाच्या ‘कॅम्पा’कडे पाठपुरावा सुरू आहे.
---
गिधाड ‘रेस्तरां’चे होणार नूतनीकरण
हरसुल वनपरिक्षेत्रातील खोरीपाडा येथील गिधाड ‘रेस्तरां’ यावर्षी कात टाकणार आहे. रेस्तरांचे नूतनीकरण वन विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. प्रवेशद्वारापासून तर फेन्सिंगपर्यंतची सर्व दुरुस्ती आणि मृत पावलेल्या पाळीव प्राण्यांचे मृतदेह वाहतुकीबाबतदेखील नव्याने नियोजन करण्यात येणार आहे.
---
ममदापूरला पर्यटक निवास संकुल
ममदापूर राखीव संवर्धन हे काळवीटांसाठी प्रसिद्ध आहे. येथील ‘इको टुरिझम’ला चालना देण्यासाठी पर्यटकांकरिता नाशिक पूर्व वन विभागाने निवास संकुल उभारण्यात आले आहे. देवदरी येथील वन विभागाचे हे निवास संकुल लवकरच कार्यान्वित होईल. साधारणत: जानेवारीअखेर त्याचे लोकार्पण वन विभागाकडून करण्यात येणार आहे. (फोटो आरवर ३१ममदापूर नावाने सेव्ह)
---
‘हट्टी’ला बटरफ्लाय गार्डन
धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी हट्टी गावाजवळ पूर्व वन विभागाकडून विकसित करण्यात आलेल्या ‘निसर्ग पर्यटन केंद्रात’ उभारण्यात आलेल्या बटरफ्लाय गार्डनचाही आता पर्यटकांना आनंद लुटता येणार आहे. लॉकडाऊन काळात येथे वन विभागाने काही विकासाच्या योजना राबवून या पर्यटन केंद्राचे रुपडे पालटण्याचा प्रयत्न केला आहे. या केंद्रात बालोद्यानात नवीन खेळणी बसविण्यात आली आहेत. विविध फुलपाखरांचे ‘सेल्फी पॉइंट’ तयार करण्यात आले आहे. (३१हट्टी नावाने फोटो आर वर सेव्ह)
---
उखळीमाळ निसर्ग अनुभव स्थळ
निसर्गाशी एकरुप होण्यासाठी पूर्व वन विभागाने वडनेरभैरव जवळी उखळीमाळ येथे गवताळ प्रदेशावर निसर्गप्रेमींसाठी अनोखे असे एक नवीन स्थळ विकसित केले आहे. या ठिकाणी गवताळ प्रदेशातील जैवविविधता शिकण्यास मिळणार आहे, तसेच बायोमिमिक्री संकल्पना येथे अनुभवयास येणार आहे. येथे आकर्षक पद्धतीची माहितीफलके सचित्र उभारण्यात आली आहेत. विविध पक्षी, प्राणी, कीटक, सर्पांची येथे माहिती हाैशी निसर्गप्रेमींना घेता येणार आहे. नव्या वर्षात हे स्थळ खुले केले जाणार आहे. (फोटो आरवर ३१निसर्ग नावाने सेव्ह)