नाशिक : हवामान खात्याकडून गुरुवारी (दि.७) नाशिकला ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला होता. शहरात पावसाचा जोर त्या तुलनेत कमी राहिला. मध्यरात्रीनंतर पावसाच्या मध्यम सरींचा सुरू झालेला वर्षाव हा दिवसभर कायम राहिल्याने शहर ओलेचिंब झाले. संध्याकाळपर्यंत शहरात १६.८ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली. शुक्रवारी (दि.८) ऑरेंज ॲलर्ट कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. यामुळे मुसळधार पाऊस ग्रामीण भागात अपेक्षित आहे.
दमदार सरींच्या वर्षावाची प्रतीक्षा नाशिककर मागील काही दिवसांपासून नाशिककर करत आहेत. जुलै उजाडल्यानंतर नाशिककरांच्या आशा अधिकच पल्लवित झाल्या होत्या. मात्र पहिला आठवडा उलटूनसुद्धा शहरात जोर‘धार’ वर्षाव झालेला नाही. या आठवड्यात कधी हलक्या, तर कधी मध्यम सरी अगदी अल्पवेळ बरसल्या. संततधार पावसालाही सुरुवात होऊ शकलेली नाही. गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाच्या मध्यम ते तीव्र सरींचा वर्षाव होऊ लागल्याने नाशिककर सुखावले. शहरातील रस्त्यांवर दिवसभर पाणी वाहत होते. तसेच चाकरमान्यांकडून दुचाकींवरून प्रवास करताना रेनकोटचा वापर केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळाले. गुरुवारी दिवसभर अचानकपणे वेगवान मध्यम ते तीव्र सरींचा पाच ते दहा मिनिटांसाठी वर्षाव होत राहिला. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा ढग दाटून आले की सरींचा वर्षाव सुरू होत होता. मध्यरात्रीपासून सकाळी आठ वाजेपर्यंत १०मिमी, तर सकाळपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ६.८ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली. शनिवारी (दि.९) नाशिकला ‘यलो ॲलर्ट’असणार आहे; म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.