नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे दररोज केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्यांच्या प्रमाणातही कमालीची वाढ झाली आहे. शासकीय लॅबमध्ये दररोज २ हजाराहून अधिक सॅम्पल्स तपासणीसाठी पाठवले जात असून खासगी लॅबमध्ये तर जवळपास अडीचपट अधिक म्हणजेच ५ हजारांहून अधिक सॅम्पल्सची तपासणी केली जात आहे. त्यामुळे नाशिककरांचा दिवसाला जवळपास ४५ लाखांवर खर्च केवळ कोरोना चाचणीसाठी होत आहे.
कोरोना चाचण्यांचे प्रमाण मार्च महिन्याच्या प्रारंभापासून माेठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात शासकीय लॅबमधून चाचण्यांचा अहवाल मिळण्यास काहीसा विलंब लागण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक मोठ्या प्रमाणात स्वेच्छेने खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी अहवाल पाठवत आहेत. शासकीय लॅबमधून मिळणारा अहवाल निशुल्क असला तरी खासगी लॅबमधून टेस्टसाठी दिल्या जाणाऱ्या अहवालामागे प्रति सॅम्पल ८५० रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे खासगीतील सॅम्पल्सच्या अहवालांसाठी निर्धारित दराप्रमाणे नाशिककरांना तब्बल ४५ लाखांहून अधिक रक्कम खर्च करावी लागत आहे.
इन्फो
आठवडाभरात तब्बल पन्नास हजारांवर चाचण्या
शहर आणि जिल्ह्यात मिळून दिवसाला एकूण आठ ते नऊ हजारांहून अधिक सॅम्पल्स पाठवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर गत आठवडाभरात मिळून किमान पन्नास हजारांहून अधिक आरटीपीसीआर चाचण्या शासकीय आणि खासगी लॅबव्दारे करण्यात आल्या आहेत. कुटुंबातील सदस्यांना किंवा कार्यालयीन सहकाऱ्यांना लागण झाल्यास खबरदारी म्हणून कोरोनाची चाचणी करुन घेण्याच्या प्रमाणात दिवसागणिक भर पडत आहे.
इन्फो
अहवाल मिळेपर्यंत अनिश्चितता
कोणतीही लक्षणे नसली तरी कुणी संबंधित बाधित आढळल्यास कोरोनाच्या आरटीपीसीआरचे सॅम्पल दिल्यापासून त्याचा अहवाल हाती पडेपर्यंत प्रत्येकाच्या मनावर भीतीचे सावट असते. कोरोनाच्या अहवालाबाबतची ही अनिश्चितता तसेच तणावदेखील अनेकांसाठी असह्य ठरतो.
कोट
जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने चाचण्यांच्या प्रमाणात देखील प्रचंड वाढ झाली आहे. शासकीय लॅबमध्ये जाणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण दिवसाला दोन हजारांहून अधिक आहे. तसेच त्यात सातत्याने वाढ देखील होत आहे.
डॉ. उत्कर्ष दुधेडीया, जिल्हा शासकीय रुग्णालय