वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्यास सध्यातरी नाशिक शहर पोलिसांना अपयश येत आहे. सोनसाखळी चोरांसह बनावट पोलिसांनीसुद्धा या आठवड्यात अस्सल पोलिसांना आव्हान दिले आहे. यामुळे शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कितपत गस्त कठोर केली जाते आणि पोलिसांकडून गुन्हेगारांना कसा पायबंद घातला जातो? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे, कारण नाशिककरांची बंद घरे, रस्त्यांलगत उभ्या केल्या जाणाऱ्या मोटारी इतकेच काय तर अंगावरील दागिनेदेखील सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गोदाकाठी वसलेल्या या शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना पोलिसांचे मनुष्यबळदेखील आता कमी पडू लागले आहे. शहर पोलीस आयुक्तालयाची हद्द दोन परिमंडळांमध्ये विभागली गेली असून, एकूण १३ पोलीस ठाणे या परिमंडळांमध्ये आहे. प्रत्येक परिमंडळाला स्वतंत्र उपायुक्त, सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत, तसेच पोलीस ठाण्यांची सूत्रे स्वतंत्ररीत्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या हाती देण्यात आली आहेत.
मागील पंधरवड्यापासून शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. हाणामाऱ्या, घरफोड्या, लुटमार, वाहनचोरी, वाहनांच्या काचा फोडून चोरी, जबरी लूट, चेन स्नॅचिंग, तोतया पोलिसांकडून लूट, कौटुंबिक वादातून खून यांसारखे गुन्हे वाढल्याने नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कुठलाही वचक राहिला नसल्याची चर्चा शहरात केली जात आहे. गुन्हेगारांच्या टोळ्यांभोवती ‘मकोका’चा फास आवळल्यानंतर ‘खाकी’चा दरारा अधिक वाढेल, अशी आशा नाशिककरांकडून केली जात होती; मात्र पोलीस प्रमुखांच्या या ‘मकोका’ कारवाईनंतर अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी पाहिजे तसा गुन्हेगारांवर अंकुश ठेवू शकले नाही. परिणामी, शहरात सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी फोफावल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, पर्यावरणमंत्री एवढेच काय तर राज्याचे पोलीस महासंचालक, अपर पोलीस महासंचालकदेखील नाशकात असताना थेट पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरच एका राजकीय संघटनेच्या महिलेने आपल्या पतीसह अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाच्या केलेल्या प्रयत्नामुळे शहर पोलिसांची इभ्रत वेशीवर टांगली गेली.
-अझहर शेख, नाशिक.