नाशिक : अवचिता परिमळू, तेरे बिना जिंदगीसे कोई, श्रावणात घननीळा बरसला, सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, असा बेभान हा वारा, तेरे बिना जिया जाए ना, ओ सजना बरखा बहार आयी, शिशा हो या दिल हो आणि मेरी आवाजही पहचान है अशा एकाहून एक सरस हिंदी, मराठी गीतांना प्रभावीपणे सादर करीत नाशिकच्या गायिकांनी अनोखी स्वरांजली अर्पण केली. सूरसम्राज्ञी लतादीदी यांना बाबाज थिएटरच्या वतीने आयोजित ‘मेरी आवाज ही पहचान हैं’ या सांगीतिक रजनीने नाशिकमधील २५ गायिकांनी सुरावटींद्वारे आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लतादीदींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंगेशकर कुटुंबीयांचे स्नेही मधुकर झेंडे, बाबाजचे संस्थापक प्रशांत जुन्नरे, वसंत भोसले, डॉ. संजय धुर्जड, विजय राजेभोसले, राजेश सावंत, एन. सी. देशपांडे, प्रा. प्रीतीश कुलकर्णी, श्रीकांत बेणी, सदानंद जोशी, अमोल पाळेकर यांनी आदरांजली वाहिली. अण्णा झेंडे यांनी मंगेशकर कुटुंबीयांच्या स्मृतींना उजाळा दिला. निवेदनाच्या माध्यमातून लतादीदींच्या आठवणींना उजाळा निवेदक सदानंद जोशी आणि संतोष फासाटे यांनी केले. यावेळी आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांनी त्यांच्या कुंचल्याने रंगमंचावर चित्रमय स्वरांजली अर्पण केली.
इन्फो
या गायिकांच्या स्वरांनी रंगली मैफल
अस्मिता सेवेकरी यांनी सादर केलेल्या अवचिता परिमळूने स्वरांजलीला प्रारंभ झाला. त्यानंतर मीना परुळकर-निकम, रोहिणी पांडे, विद्या कुलकर्णी, सोनल पडाया, अपर्णा देशपांडे, नमिता राजहंस, दिशा दाते, मधुरा बेळे, प्राजक्ता अत्रे-गोसावी, मानसी राजहंस, सुरभी गाैड, अश्विनी भार्गवे दसककर, गौरी दसककर, ईश्वरी दसककर, सुरश्री दसककर, आरती पिंपळकर, रिटा डिसुझा, रसिका नातू, प्रियांका कोठावदे, तन्मयी घाडगे, अश्विनी सरदेशमुख, रेणुका बायस, श्रेयसी राय यांच्या गायनाने मैफल रंगली.