नाशिकरोड : परिसरातील गावठाण, झोपडपट्टी भागासह व्यापारी पेठ असलेल्या जवाहर मार्केट भागात पावसाचे पाणी साचत असल्याने गोरगरीब रहिवाशांना व व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.देवळालीगाव घोलपवाडा, राजवाडा, वीटभट्टी परिसर, सत्कार पॉइंट चंदनवाडी, सुभाषरोड पवारवाडी, देवी चौक जवाहर मार्केट या भागात चढ-उतार स्थिती, तुंबलेल्या व छोट्या गटारी यामुळे या भागात नेहमीच पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. राजवाडा भागातील उघड्या व छोट्या गटारी तुंबल्या असून, उतार भागातील वीटभट्टी परिसराकडे पावसाचे व गटारीचे पाणी वाहून जात असल्याने त्या भागातील रहिवाशांच्या घरात दुर्गंधीयुक्त पाणी शिरते. तसेच उघड्या जागेत पाणी साचत असल्याने दुर्गंधी पसरून मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरते. तसेच सुभाषरोड जुन्या मटन मार्केटजवळील पवारवाडी हा परिसर रस्त्याच्या उंचीपेक्षा खोलगट जागेत आहे. यामुळे रस्त्याने वाहून येणारे पावसाचे पाणी खोलगट परिसर असलेल्या पवारवाडी भागातील रहिवाशांच्या घरात शिरते. यामुळे संसारोपयोगी वस्तुंचे नुकसान तर होतेच. शिवाय रात्री-अपरात्री पावसाचे पाणी आल्यास रहिवाशांना मात्र जागून काढावी लागते. यामुळे रोगराईचा फैलाव मोठ्या प्रमाणात होता.देवळालीगाव येथील घोलप वाडा येथील दर्शनी बाजूचे खरे रस्त्याच्या उंचीपेक्षा खोलगट जागेत असल्याने रहिवाशांच्या घरात दोन-तीन फुटांपर्यंत पाणी साचते. तसेच सत्कार पॉइंट चंदनवाडी भागातदेखील पावसाचे पाणी साचत असल्याने रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच देवी चौकातून वाहून येणारे पावसाचे पाणी जवाहर मार्केट येथील खोलगट जागेत साचत असल्याने व्यापाऱ्यांना व ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. गावठाण, झोपडपट्टी भागातील जुन्या कमी आकाराच्या गटारी त्यांची झालेली तुटफूट, उघड्या गटारीत घाण पडून तुंबल्याने बहुतांश ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने रहिवासी, व्यापारी यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.
नाशिकरोड परिसरात, बाजारपेठेत साचते तळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:47 AM