नाशिकरोड : देवी चौकातील एका सराफ व्यावसायिकाच्या दुकानात दोघे युवक पिस्तूलचा धाक दाखवून लुटत असून, मदतीकरिता यावे, अशी माहिती शेकडो मोबाइलधारकांना एकाचवेळी मिळताच शेकडो व्यापारी, नागरिक, महिला व पोलीस काही मिनिटांतच दाखल झाले.पोलिसांनी उपस्थितांच्या मदतीने दोघा दरोडेखोरांना ताब्यात घेतले. मात्र नागरी सुरक्षा यंत्रणेचे मॉकड्रिल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.सराफ व्यावसायिक राजेंद्र नागरे यांच्या दुकानात सोमवारी सकाळी ११ वाजता हेल्मेटधारी दोघे दरोडेखोर पिस्तूलचा धाक दाखवून दागिने व रोकड लुटण्यास आले असल्याची माहिती परिसरातील शेकडो मोबाइलधारकांना एकाच वेळी मोबाइलधारकांना (फोन कॉल) देण्यात आली. नागरी सुरक्षा यंत्रणा टोल फ्री क्रमांकावर फोन करून दिलेल्या माहितीमुळे एकाच वेळी शेकडो मोबाइलधारकांना घटनेची व मदतीची माहिती मिळाली होती. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने नागरे यांच्या दुकानात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दोघा संशयितांना पकडले. सर्वप्रकिया घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी नागरी सुरक्षा यंत्रणाचे मॉकड्रिल असल्याचे सांगितल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी याबाबतची माहिती देत प्रबोधन केले.
नाशिकरोडला नागरी सुरक्षा यंत्रणेचे मॉकड्रिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:36 AM