नाशिकरोड, प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग वाढला असतानाही विनामास्क फिरणाऱ्यांचे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. अशा लोकांवर जरब बसविण्यासाठी उपनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत महिनाभरात ४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कडक कारवाई सुरू केली आहे. १ मार्च ते ४ एप्रिलअखेरपर्यंत झालेल्या कारवाईत सुमारे ४ लाखांचा दंड करण्यात आला आहे. मास्कप्रकरणी ३८४ व्यक्तींवरील कारवाईतून १ लाख ५३ हजार ८०० रुपये, सोशल डिस्टन्सिंग आणि आस्थापनांवरील कारवाईतून २ लाख ३९ हजार, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या पाचजणांकडून पाच हजारांचा असा एकूण ३ लाख ९७ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या ११५ लोकांना बिटको रुग्णालयात नेऊन कोविड चाचणी घेतली असता दोनजणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले. गांधीनगर भाजी मार्केट सील करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.