नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकावर बसविण्यात आलेल्या सरकत्या जिन्याच्या पायथ्याशी असलेल्या सेन्सरची तोडफोड केल्याने सरकता जिना उद्घाटनानंतर दीड दिवस बंद पडला होता. काही उपद्रवींकडून सरकता जिना, लिफ्ट व वॉटर वेडिंग मशीन या ठिकाणी छेडछाड करत असल्याने त्यांच्यावर रेल्वे पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलीस ठाण्यालगत प्लॅटफॉर्म एकवरून पादचारी पुलावर जाण्यासाठी सरकता जिना (एक्सेलेटर) बसविण्यात आला असून, शनिवारी त्याचे उद्घाटन करण्यात आले. शनिवारी दिवसभर सरकता जिना व्यवस्थित सुरू होता. मात्र सरकत्या जिन्याच्या पायथ्याशी असलेल्या सेन्सरची शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने छेडछाड केल्याने सरकता जिना सोमवारी दुपारपर्यंत बंद पडला होता. रेल्वेचे अभियंता प्रवीण पाटील यांनी सरकत्या जिन्याचे ठेकेदार यांच्याशी संपर्क साधून रविवारी सकाळपासून तपासणी करून दुरुस्ती केल्यानंतर सोमवारी दुपारी सरकता जिना पूर्ववत सुरू झाला. रेल्वेस्थानकावर सरकता जिना सुरू झाल्यानंतर लहान मुले, मुली, युवक, नागरिक, महिला सहज फिरायचे म्हणून त्या सरकत्या जिन्यावरून ये-जा करत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून त्या सरकत्या जिन्याकडे तिकीट तपासणीसला उभे करण्याचे नियोजन करण्यात येत असून, त्यांच्याजवळ तिकीट, आरक्षण आहे त्यांनाच सरकत्या जिन्यावरून ये-जा करून देणार आहे. प्लॅटफॉर्मवर दोन ठिकाणी बसविलेल्या लिफ्टमध्येदेखील नुकसान करून अस्वच्छता केली आहे, तर पिण्याच्या पाण्याच्या वॉटर वेडिंग मशीनशी सतत छेडछाड केली जात असल्याने त्या मशीनचा बंद-चालूचा खेळ सुरू आहे. काही उपद्रवींमुळे या सोयी-सुविधांपासून प्रवाशांना वंचित राहावे लागते.कठोर कारवाईची गरजसरकता जिना, लिफ्ट व वॉटर वेडिंग मशीन येथे छेडछाड करून उपद्रव करणाऱ्यांवर रेल्वे पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. विनाकारण फुकट सरकता जिन्यांचा वापर करणाºयांना खाकीचा हिसका दाखविण्याची गरज आहे. प्रवाशांसाठी असलेल्यासोयी-सुविधांना खराब व अस्वच्छता करणाºयांवर कारवाई करण्याची गरज आहे.
नाशिकरोड रेल्वेस्थानक : सरकता जिना पडला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:12 AM