नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विविध संस्था, संघटनांच्या आंदोलकांनी पोलिसांचे बंदी आदेश झुगारून मोर्चा काढला. वुई सपोर्ट मुंढे, वुई वॉँट मुंढे अशा घोषणा देत मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांना सामोरे जात आयुक्तांनी त्यांचे आभार मानताच शहर विकासासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले. महापालिका आयुक्तांवरील अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर मुंढे यांना समर्थन तर राजकारण्यांना विरोध करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या विरोधी मोर्चामुळे महापालिकेच्या बाहेर कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी गुरुवारी (दि. ३०) परवानगी नाकारली होती. त्यातही शुक्रवारी सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अविश्वास ठराव रद्द करण्याच्या सूचना आल्याने ठराव बारगळल्याचे स्पष्ट होते. तथापि, वॉक फॉर कमिशनरची मोहीम अगोदरच राबविण्यात येत असल्याने पूर्वनियोजनानुसार गोल्फ क्लब येथून मोर्चा काढण्यात आला. वुई वॉँट मुंढे, नो गुंडे-ओन्ली मुंढे अशा प्रकारच्या घोषणा आणि फलक हाती घेऊन हा मोर्चा गोल्फ क्लबवरून महापालिकेच्या राजीव गांधी भवनवर काढण्यात आला. तेथे माकपाचे नेते डी. एल. कराड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष हंसराज वडघुले, सचिन मालेगावकर यांच्यासह अन्य काही जणांनी मनोगत व्यक्त केले आणि मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठरावच नव्हे तर अवेळी बदली केल्यास त्यास कडाडून विरोध करण्याचे जाहीर करण्यात आले.यानंतर सचिन मालेगावकर, जितेंद्र भाभे यांच्यासह अन्य प्रतिनिधींनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना नाशिककरांशी दोन मिनिटे संवाद साधण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार आयुक्त मुंढे हे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आले. तेथे त्यांनी खुर्चीवर उभे राहून आंदोलकांशी संवाद साधला. सर्वांची कृतज्ज्ञता व्यक्त करताना शहराच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन केले. त्यानंतर आयुक्तांच्या दालनात पुन्हा प्रतिनिधी मंडळाने भेट घेतली. यावेळी आयुक्तांकडून त्यांनी कर पद्धती समजून घेतली. आयुक्तांनी करवाढ कमी करण्याची घोषणा केली असली तरी त्यासंदर्भात आयुक्तांनी त्याला कायदेशीर स्वरूप द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे महापालिकेतील गैरव्यवहार बंद केल्याने समर्थन देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. सदर निवेदन देताना सुजाता घोषाल, माधवी भदाणे, माधवी रहाळकर, विश्वास वाघ, प्रकाश निकुंभ यांचा समावेश होता. या मोर्चात सुनील आव्हाड, जे. टी. जाधव, शिवाजी ढोकळे. अॅड. के. जी. कुलकर्णी, बाबासाहेब चव्हाण, शरद पटवा आदींसह प्रमुख उपस्थित होते. तसेच प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनसह काही संस्थाही सहभागी झाल्या होत्या.मुंढे यांच्यावर जनसुनवाई!महापालिकेच्या वतीने करण्यात आलेली करवाढ, ती नेमकी कोणत्या मिळकतींना लागूू आहे. त्यावर निराकरण करण्यासाठी आयुक्त मुंढे यांच्या उपस्थितीत कालिदास कला मंदिरात जनसुनवाई घेण्यात येणार असून, आयुक्तांनी त्यास उपस्थित राहण्याचे मान्य केले.
तुकाराम मुंढे यांना समर्थन देण्यासाठी नाशिककर रस्त्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 12:51 AM