नाशिक : डेबिट-क्रडिट कार्डावरील सोळाअंकी क्रमांकासह कार्डावरील मॅग्नेटिक चीफ किंवा स्ट्रीपमध्ये ‘सुरक्षित’ समजली जाणारी गोपनिय माहिती पिनक्रमांकासह संकलित करत विशेष सॉफ्टवेअर, क्लोनिंग मशिनद्वारे बनावट कार्डात क्लोन करून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लाखो रूपयांना अनेकांना गंडा घालणाऱ्या संशयित आरोपीच्या मुसक्या बिहारमधील पाटणा शहरातून नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी आवळल्या. त्याच्याकडून तीन लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून बॅँकेच्या खात्यावर असलेली ११ लाख ५६ हजार ७४३ रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.नाशिक शहरासह जिल्ह्यात दररोज विविध पोलीस ठाण्यांमध्ये बॅँकेच्या एटीएममध्ये अथवा घरी डेबिट, क्रेडिट कार्डावरील गोपनिय माहिती ‘हॅक’ करून अथवा नागरिकांची दिशाभूल करून त्यांच्यामार्फत पिनकोडवगैरे मिळवून चोरटे लाखो रुपयांना चुना लावत असल्याच्या तक्रारी नित्यनेमाने दाखल होत आहे. सायबर पोलिसांपुढे या गुन्ह्यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतदेखील अशाप्रकारच्या घटना राजरोसपणे सुरू आहेत,मात्र शहर सायबर पोलिसांना अद्याप असा एकही गुन्हा उघडकीस आणण्यास यश आलेले नाही. पिंपळगाव बसवंत मधील फिर्यादी संतोष नाना पाचोरकर यांच्या खात्यावरील रक्कमेचा अज्ञात दोघा संशयितांनी अपहार केल्याची तक्रार ग्रामीण सायबर पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत तपासाला गती दिली. डेबिट, क्रेडिट कार्ड क्लोनकरून लाखो रुपयांचा अपहार केला जात असल्याची बाब पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात समोर आली. हा प्रकार पोलीस निरिक्षक सुभाष अनमुलवार यांनी आरती सिंह यांच्या निदर्शनास आणून देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्ह्यांचा तपास जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर सुरू केला. प्राप्त तक्रारींनुसार विविध घटनास्थळावरील एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तांत्रिक माहितीची सखोल पडताळणी करत संशयिताची गुन्ह्याची पध्दत जाणून घेत त्या दिशेने तपासाला गती देऊन संशयितांचा शोध सुरू केला. यामध्ये आपल्या कौशल्याने पोलिसांना मोठे यश आले आहे. बिहार राज्यातील पाटणा जिल्ह्यातील जामुन गल्ली सब्जीबाग हा गुन्हेगारीसाठी प्रसिध्द असलेल्या धोकादायक परिसरातून संशयित जावेद वजीद खान (२४) यास स्थानिकांचा विरोध झुगारून शिताफीने बेड्या ठोकल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले. या कारवईत अनमुलवार यांच्यासह उपनिरिक्षक कल्पेश दाभाडे, प्रमोद जाधव, पिरिक्षीत निकम, प्रकाश मोरे, सुनील धोकट यांचा सहभाग आहे. त्यांना तांत्रिक विश्लेष विभागाचे हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांची मदत मिळाली. संशयित खानचा एक साथीदार मोहम्मद जावेद ऊर्फ एहसान (रा.दसरथपुर, जि.गया) हा या गुन्ह्यात फरार आहे. संशयित खान याला जिल्हा व सत्र न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेत त्यास १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अन्य शहरांमध्ये अशा पध्दतीचे घडलेले गंभीर गुन्हे उघड उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
नाशिक ग्रामीण सायबर पोलिस : राज्यात लाखोंचा अपहार करणाऱ्या परप्रांतीयास ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 6:50 PM
डेबिट कार्डावरील मॅग्नेटिक चीफ किंवा स्ट्रीपमध्ये ‘सुरक्षित’ समजली जाणारी गोपनिय माहिती पिनक्रमांकासह संकलित करत विशेष सॉफ्टवेअर, क्लोनिंग मशिनद्वारे बनावट कार्डात क्लोन करून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लाखो रूपयांना अनेकांना गंडा घालणाऱ्या संशयित आरोपीच्या मुसक्या बिहारमधील पाटणा शहरातून नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी आवळल्या.
ठळक मुद्देबॅँक खात्यावर असलेली ११ लाख ५६ हजार ७४३ रुपयांची रोकड जप्त आयुक्तालयाच्या हद्दीतदेखील अशा घटना राजरोसपणे सुरूसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तांत्रिक माहितीची सखोल पडताळणी