नाशिक : जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू अड्डयांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून गेल्या काही महिन्यांपासून छापासत्र सुरू आहे. गुरुवारी (दि.१) पहाटेच्या सुमारास ग्रामीण पोलिसांच्या सुमारे ५५० अधिकारी व अंमलदारांनी जिल्ह्यात एकाच वेळी ६६ ठिकाणी छापे टाकून सुमारे ११ लाख रुपयांची गावठी दारू, रसायन व अन्य साधन सामग्री जप्त केली आहे, तर याप्रकरणी ३१ गुन्हे दाखल केले आहेत. छापासत्रात जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ७, कळवणमधील ५, वाडीवऱ्हे, घोटी, जायखेडामधील प्रत्येकी ४, देवळा, इगतपुरी, एमआयडीसी सिन्नरमधील प्रत्येकी २ व पेठमधील एका ठिकाणाचा समावेश आहे.
या छापासत्रात पोलिसांनी अवैध दारू गाळप करणाऱ्या ठिकाणांसोबतच रसायन बनविण्यासाठी लागणाऱ्या गूळ विक्रेत्यांवरही कारवाईचा बडगा उगारला. जिल्ह्यातील डोंगर-दऱ्या, नदी-नाल्यांलगत असलेल्या गावांमध्ये गावठी दारू हातभट्टयांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर मालमत्ता हस्तगत केली आहे. देवळा तालुक्यातील चिंचवे गावातील पाझर तलावाच्या काठावर लोखंडी पाईप, फॅन व बॅटरीच्या साहाय्याने भट्टीला अतिरिक्त हवा देण्याचे हॅण्डमेड ब्लोअरसुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी नुकतीच १२ विशेष पथके स्थापन केली असून, त्यांच्या मदतीने जिल्ह्यात कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी मालेगाव तालुक्यातील वजीरखेडे व देवळा तालुक्यातील चिंचवे गावच्या शिवारात स्वत: छापासत्रात सहभाग घेत पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.