- अझहर शेख नाशिक - येथील 105वर्षे जुन्या प्रख्यात शिक्षण संस्था गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा महासंचालक प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी यांचे पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची वार्ता येताच सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिव सकाळी 10 वाजता येथील बीवायके महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी 5:30वा. पार्थिवावर नाशिक येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून गोसावी सर यांची ओळख होती. डॉ. मो. स. गोसावी यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) उत्तीर्ण केल्यानंतर प्रसासकीय सेवेची निवड न करता शिक्षण क्षेत्राची निवड करून या क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविलेला होता. त्यांची वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील आदर्श शिक्षकाची भूमिका सर्वांना प्रभावित करणारी होती.
प्राथमिक ते विद्यापीठीय सर्व परीक्षांमध्ये सतत अव्वल स्थान कायम ठेवण्याची अजोड कामगिरी त्यांच्या बुद्धिमत्तेची साक्ष देते. भारतातील मॅनेजमेंट सायन्स' या विषयाचे ते पहिले पी. एच. डी. साहित्याचार्य, हिंदी साहित्य रत्न, संस्कृत पंडित असा बहुमान मिळविणारे व्यक्ती होते. वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी प्राचार्य पदाची धुरा हाती घेतली. सुमारे 37 वर्ष बी. वाय. के. वाणिज्य महाविद्यालयाचे सर्वात तरुण प्राचार्य म्हणून प्रदीर्घ सेवाभावी असा विक्रम गोसावी सरांच्या नावावर कायमचा जमा झाला आहे. सरांना शिक्षण क्षेत्राची आवड असल्याने या क्षेत्रात त्यांनी सतत नवे नवे प्रयोग केले. दुर्मिळ गोष्ट म्हणजे जसजसा काळ पुढे जातो तसतसे सरांच्या मनातील सर्जनशील कल्पना आणि उपक्रम बहरास येत असायच्या. ही दुर्मिळ गोष्ट गोखले एज्युकेशन संस्थेने पाहिली आहे.
बी. वाय. के. वाणिज्य महाविद्यालयाला सरांनी १९५८ ते १९९५ या कालावधीत आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविले. देशातील १५,००० वाणिज्य महाविद्यालयांपैकी बी. वाय. के. वाणिज्य महाविद्यालयाला राष्ट्रीय पातळीवर नॅक संस्थेने 'अ वर्ग' देवून सन्मानित केले आहे. देशातील आय.एस.ओ. ९००१-२०१५ हे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळालेले हे एकमेव महाविद्यालय आहे. उच्च शिक्षणाला उद्योजकतेकडे नेण्यासाठी व विद्यापीठीय शिक्षणाला नवी दिशा देण्यासाठी द्रष्टेपणा, धडाडी, चिकाटी, नवनिर्मिती दाखवून गोसावी सर यांनी विद्यापीठीय विशेषतः वाणिज्य विद्याशाखेत सर्व स्तरावरील शिक्षण संजीवक, परिणामकारक व प्रवाही करण्याचा आदर्श वस्तुपाठ देशामध्ये उभा केला. शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाचे वैशिष्ट म्हणजे त्यांनी व्यवस्थापन शिक्षणामध्ये दिलेले योगदान व्यवस्थापन, प्रशासन या क्षेत्रात नवनवे प्रयोग व नवीन कार्यप्रणालीचे संशोधन आजही सुरु होते.
व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. या प्रयत्नाला १९६४साली यश आले व दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरु झाला. १९७०साली एम. बी. ए. पदवी प्राप्त केलेली पहिली तुकडी बाहेर पडली. व्यवस्थापनाचे शिक्षण विद्यापीठीय पातळीवर देणारा हा पहिला प्रयोग होता. गोसावी सर यांची आजपर्यंत २०पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच १०० च्या वर संशोधनपर निबंध १०० ग्रंथांचे संपादन, वेद उपनिषदे, गीता यांचा गाढा व्यासंग होता. त्यांनी अनेक सन्मान व पदे भूषविलेली आहेत त्यामध्ये पुणे विद्यापीठाचे वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता, व्यवसाय प्रशासन, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच कार्यकारिणीचे व विधी सभेचे सभासद, भारतीय वाणिज्य सभेच्या कार्यकारिणी समितीचे सभासद तसेच उपाध्यक्ष, अध्यक्ष, आंतरविद्यापीठीय वाणिज्य ज्ञान व संशोधन मंडळाचे अध्यक्ष, अखिल भारतीय व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष अशी अनेक पदे गोसावी सर यांच्या नावावर आहेत.
सरांची गणना केंब्रिजच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगातील १०० शिक्षण तज्ञांमध्ये केली आहे तर युनोच्या संस्थेने महाराष्ट्राचे कुलपती म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. भारताचे माजी वाणिज्यमंत्री मोहन धारिया यांनी सरांना शिक्षण महर्षी या किताबाने सन्मानित केले होते . तसेच विद्यापीठ अनुदान मंडळाचे माजी अध्यक्ष व कुलगुरू डॉ. निगवेकर यांनी 'ज्ञानहिरा' म्हणून सरांना गौरविलेले आहे. प्रख्यात स्वरसम्राज्ञी लता दिदींनी सरांचा अमृत महोत्सवी सत्कार करून सरांना 'विद्यासरस्वती' हा पुरस्कार प्रदान केला. याशिवाय राजीव गांधी शांतता पुरस्कार', 'दासोहभूषण', 'ज्ञानचक्रवर्ती', 'श्री. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र भूषण पुरस्कर, भारतरत्न महामहीम 'डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सुवर्ण पदक', 'डॉ. बालाजी तांबे ज्ञानतपस्वी पुरस्कार', 'ग्लोबल इकॉनॉमिक असोसिएशन दिल्लीतर्फे शिक्षण महर्षी पुरस्कार, समाजासाठी अविरतपणे झटणा-या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जाणा-या पुरस्कारासाठी सुविचार मंच या संस्थेने देखील सरांची निवड केली होती . तसेच महात्मा गांधी पुरस्कार २०१६. सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सरांचा गौरव झाला आहे. नुकताच सरांना 'नाशिक सन्मान' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने नाशिकने शिक्षण क्षेत्रातील व्यासंग असलेले तपस्वी व्यक्तिमत्त्व कायमचे गमावले आहे. गोसावी सर यांच्या पश्चात्य कन्या प्राचार्य डॉ.दीप्ती देशपांडे व शैलेश गोसावी आणि कल्पेश गोसावी हे दोन मुलगे आहेत.