नाशिक : पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत दुचाकीवरून पलायन करणा-या दोन दुचाकीस्वारांना सरकारवाडा पोलिसांनी नाईक महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर पाठलाग करून पकडण्याची घटना शनिवारी (दि़३) दुपारच्या सुमारास घडली़ या दोघांची झडती घेतली असता त्यांच्या गावठी पिस्तुल आढळून आली़ सिडकोच्या त्रिमूर्ती चौकात राहणारे हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांनी दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर रोडवरील व्ही़एऩनाईक कॉलेजजवळ नाकाबंदी करण्यात आली होती़ या नाकाबंदीदरम्यान एका दुचाकीवरील दोन युवकांनी पोलिसांना पाहून पळ काढल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला़ या दोघांना पोलिसांनी व्ही़एऩनाईक कॉलेजच्या भिंतीजवळ पकडले असता त्यांनी आपली नावे चेतन आनंदा ठमके (१९, रा़नवजीवन डे स्कूल, त्रिमूर्ती चौक, सिडको) व पंकज विनोद आहेर (१८, रा़शिवशक्ती चौक, साईबाबा मंदिरासमोर, त्रिमुर्ती चौक, सिडको) असल्याचे सांगितले़ पोलिसांनी या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विना परवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा आढळून आला़ तसेच चालवित असलेल्या वाहनाची कागदपत्रेही नव्हती़
सरकारवाडा पोलिसांनी ठमके व आहेर या दोघांनाही अटक केली असून त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़