नाशिक : रशियातील सोची शहरात सुरू असलेल्या बुद्धिबळाच्या फिडे वर्ल्ड कपमध्ये नाशिकचा ग्रॅन्डमास्टर विदीत गुजराथी याने चौथ्या फेरीत अमेरिकन प्रतिस्पर्ध्यावर मात करीत पाचव्या फेरीत अर्थात उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
विदीत गुजराथी याने प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ विश्वचषकात आतापर्यंत दमदार वाटचाल करीत अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे. विदीतने चौथ्या फेरीत अमेरिकेच्या जेफरी शँग या बुद्धिबळपटूला क्लासिकल प्रकारातील दोन गेममध्ये थेट पराभूत केल्याने पाचव्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. पिल्सबरी डिफेन्स ओपनिंगने खेळत विदीतने ४३ व्या चालीतच विजय मिळवल्याने त्याला उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवणे शक्य झाले आहे. विदीतचे सध्याचे रेटिंग २७२६ असून पाचव्या फेरीत त्याचा सामना २६२५ अर्थात शंभर रेटिंग कमी असणाऱ्या अझरबैजानच्या वॅसिफ ड्युराबायलीशी रविवारी रात्री लढत होत आहे. नियमानुसार प्रारंभीच्या दोन क्लासिकल सामन्यांमध्ये निकाल न लागल्यास रॅपिड पद्धतीच्या दोन लढतीत, त्यातही निकाल न लागल्यास ब्लीट्झ प्रकारात आणि त्यातही निर्णायक निकाल न लागल्यास अर्नागडम प्रकारात सामना खेळवला जातो. यापूर्वीच्या लढतींमध्ये टॉप १० रॅकिंगमधील अन्य काही खेळाडूदेखील बाद झाले आहेत. मात्र, विदीतने त्याची दमदार वाटचाल कायम ठेवली असून रविवारी उशिरा आणि साेमवारच्या लढतीत त्याची पुढील वाटचाल निश्चित होणार आहे.
इन्फो
विदीत हाच एकमेव आशा
या स्पर्धेत मॅग्नस कार्लसनसारखे जागतिक अव्वल स्थानावरील खेळाडूदेखील खेळत आहेत. मात्र, विश्वनाथन आनंद या स्पर्धेत उतरला नव्हता. तर बी. अधिबान आणि हरिकृष्णा हे दोन अव्वल भारतीय बुद्धिबळपटू चौथ्या फेरीतच स्पर्धेतून बाद झाले आहेत. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये भारतीयांना एकमेव विदीतकडूनच आशा आहे.
फोटो
२५ विदीत गुजराथी चेस