- नामदेव भोर नाशिक : शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक सर डॉ. मो. स. गोसावी यांचे रविवारी (दि.९) मध्यरात्री १.४५ वाजता वयाच्या ८८ व्यावर्षी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच राजकीय दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये असलेले राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी माजी आमदार हेमंत टकले तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा केव्हीएन नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाडही यावेळी उपस्थित होते.
शहरातील बी .वाय के महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून आपल्या शैक्षणिक कारकीर्दीची सुरवात करीत ती जबाबदारी समर्थपणे पेलली. सर्वात तरुण प्राचार्य व ३७ वर्षाचा सर्वाधिक कालखंड पूर्ण करणारे प्राचार्य म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील सार्थ योगदानाला ६५ वर्षे पूर्ण झाली होती. संस्थेच्या सचिवपदाची व नंतर महासंचालक पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारल्यानंतर खऱ्या अर्थाने गोखले एज्युकेशन सोसायटीचा विकास व विस्तार झाला.
सामाजिक विकासासाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे,असाविश्वास ठेवून त्यांनी स्वतःला शिक्षणाच्या प्रचार - प्रसारासाठी आजीवन वाहून घेतले होते. त्यामुळेच त्यांचाप्राचार्य पदाचा प्रारंभ ज्या बी. वाय. के महाविद्यालयातून झाला तिथे त्यांचे पार्थिव सकाळी १० ते ५ या वेळेपर्यंत अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. याठिकाणी राज्याचे नवनिुयुक्त मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार वसंत गिते, शिवसेनेचे नेते सुनील बागुल, माजीनगरसेवक दिनकर पाटील आदींनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्याचप्रमाणे त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी प्रशांत खंबासवाडकर , प्रशांत अमीन तसेच नाशिक शहरातील अनेक मान्यवरांसह , संस्थाप्रति व सराप्रति आपुलकी आणि जिव्हाळा असलेल्या क्षत्रिय परिवार, कपाडिया परिवारातील सदस्यांनी यावेळी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.