नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी बाळासाहेब क्षीरसागर यांची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 02:17 PM2020-01-02T14:17:24+5:302020-01-02T14:37:51+5:30
राज्यातील सत्तासमीकरणे बदलल्यानंतर नाशिकमधील स्थानिक स्वराज्य संस्थेतील चित्रही बदलले आहे.
नाशिक - राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीचे समीकरण जुळून आल्यानंतर आता त्याचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही दिसून येऊ लागले आहेत. आज झालेल्या नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. नाशिकच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सयाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राज्यातील सत्तासमीकरणे बदलल्यानंतर नाशिकमधील स्थानिक स्वराज्य संस्थेतील चित्रही बदलले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी एकत्र आल्याने भाजपासाठी सत्तेचे समीकरण जुळवणे कठीण झाले. त्यामुळे अखेरीस त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
आज नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून बाळासाहेब क्षीरसागर तर भाजपाकडून जे. डी. हिरे यांचे अर्ज दाखल केला होता. तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सयाजी गायकवाड तर भाजपाकडून कान्हू गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र नंतर भाजपाच्या उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.
नाशिकच्या जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या 73 आहे. त्यापैकी एक पद रिक्त आहे. सध्या असलेल्या 72 सदस्यांमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक 25 सदस्य आहेत. तर राष्ट्रवादीचे 15, भाजपाचे 15 आणि काँग्रेसचे 8 सदस्य आहेत. त्याशिवाय माकपचे 3 आणि 6 अपक्ष सदस्य आहेत.