नाशिक - 10 रुपयाच्या नाण्यावरुन झालेला वाद एका व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगावात 10 रुपयाच्या नाण्यावरुन दुकानदार आणि ग्राहकामध्ये प्रचंड वाद झाला. यामध्ये ग्राहकानं दुकानदाराला अमानुष पद्धतीनं मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे या मारहाणीत दुकानदाराचा दुर्दैवी मृत्यू झाला, इतका हा वाद विकोपाला गेला. सईद अहमद अब्दुल हामिद (वय 53 वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या दुकानदाराचं नाव आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हामिद मालेगावातील सरदार चौकात आपले पानाचे दुकान चालवत होते. शुक्रवारी (9 नोव्हेंबर) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानावर एक ग्राहक आला आणि त्यानं तंबाखूचं पाकिट मागितले. तंबाखूच्या पाकिटाचे 10 रुपये देण्यासाठी ग्राहकानं हामिद यांना 20 रुपयांची नोट दिली आणि त्यानं 10 रुपयांचं नाणं ग्राहकाच्या हातावर ठेवलं. यावर ग्राहकानं नाण्याऐवजी 10 रुपयांच्या नोटेची मागणी हामिद यांच्याकडे केली. यावरुन दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि याचे पर्यवसान हाणामारीत झाले.
ग्राहकानं हामिद इतकी मारहाण केली की यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या, मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागले होते. दरम्यान, स्थानिकांनी रक्तानं माखलेल्या हामिद यांनी मनमाडमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, आरोपीचा शोध पोलीस घेत आहे. मालेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा तपास करत आहेत.