नाशिक - पंचवटी आणि सिडको विभागातील घंटागाडी कामगारांनी फेब्रुवारी महिन्याचे वेतन २० मार्चचा दिवस उजाडला तरी ठेकेदाराने अदा न केल्याने मंगळवारी (दि.२०) बंद पुकारला. त्यामुळे, पंचवटी आणि सिडको विभागात सकाळी एकही घंटागाडी रस्त्यावर दिसली नाही. जोपर्यंत वेतन कामगारांच्या बॅँक खात्यावर जमा होत नाही, तोपर्यंत बंद कायम ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे. महापालिका मात्र, याबाबत ठेकेदाराकडेच अंगुलीनिर्देश करत आहे.महापालिकेने डिसेंबर २०१६ मध्ये विभागनिहाय घंटागाडीचा ठेका दिला होता. त्यानुसार, पंचवटी आणि सिडको विभागाचा ठेका जी. टी. पेस्टकंट्रोल या एजन्सीने घेतला. परंतु, ठेका घेतल्यापासून या ठेकेदाराकडून विविध समस्या निर्माण केल्या जात आहेत. पहिल्यांदा संपूर्णपणे नवीन घंटागाड्या रस्त्यावर आणल्या गेल्या नाहीत. बऱ्याचदा वेळेवर गाड्या पोहोचल्या नाहीत म्हणून महापालिकेने सुमारे दोन कोटी रुपयांचा दंडही सदर ठेकेदाराला ठोठावलेला आहे. कामगारांचे वेतनाबाबतही सदर ठेकेदाराकडून कुचराई होत असल्याचा आरोप श्रमिक संघटनेचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी केला आहे. दरम्यान, २० मार्चचा दिवस उजाडला तरी, सदर ठेकेदाराने माहे फेबु्रवारीचे वेतन कामगारांच्या बॅँक खात्यात जमा केलेले नाही. त्यामुळे संतप्त कामगारांनी पंचवटी आणि सिडकोतील घंटागाड्या बंद ठेवल्या. सदर घंटागाड्या पार्कींगच्या ठिकाणाहून काढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे, दोन्ही विभागात सकाळी कचºयाचे संकलन झाले नाही. दुपारपर्यंत दोन्ही विभागातील एकही घंटागाडी खतप्रकल्पावर पोहोचलेली नव्हती. पंचवटीत ३९ तर सिडकोत ४० घंटागाड्या चालविल्या जातात. सकाळी कचरा संकलन न झाल्याने अनेकांना घरातच कचरा ठेवणे भाग पडले तर काही कचरा रस्त्यावर येऊन पडला.महापालिकेचे हात वरपंचवटी आणि सिडको विभागातील ठेकेदाराने माहे फेबु्रवारीचे वेतन अद्याप जमा केलेले नाही. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाला श्रमिक कामगार संघटनेने विचारणा केली असता,त्यांनी जबाबदारी झटकत ठेकेदाराकडे अंगुलीनिर्देश केल्याचे संघटनेचे महादेव खुडे यांचे म्हणणे आहे. वास्तविक पालक संस्था म्हणून महापालिकेने त्यात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. परंतु, महापालिकेनेही हात वर केले आहेत. जोपर्यंत वेतन जमा होत नाही तोपर्यंत घंटागाडी बाहेर न काढण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
नाशिकमध्ये पंचवटी, सिडकोत घंटागाड्यांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 1:27 PM
वेतन नाही : ठेकेदाराच्या बेपर्वाईबद्दल संताप व्यक्त
ठळक मुद्देठेका घेतल्यापासून या ठेकेदाराकडून विविध समस्या निर्माण केल्या जात आहेतठेकेदाराने माहे फेबु्रवारीचे वेतन कामगारांच्या बॅँक खात्यात जमा केलेले नाही