- संजय पाठकनाशिक - नाशिक- पुणे रेल्वे मार्ग तूर्तास सायडिंगला पडला असला तरी नाशिक ते पुणे औद्योगिक महामार्ग मात्र द्रुतगतीने पूर्ण होणार आहे. नाशिक ते पुणे औद्योगिक द्रुतगती मार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जून 2023 मध्ये घेतला होता त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून सल्लागार संस्थेने हा अहवाल नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला आहे. त्यानुसार नाशिक -पुणे औद्योगिक द्रुत गती महामार्गाच्या 213 किलोमीटर लांबीच्या अंतिम आखणीस रस्ते विकास महामंडळाने मान्यता दिली आहे.
नाशिक ते पुणे अंतर सध्या पाच तास असून हा मार्ग झाल्यावर तीन तासात नाशिकहुन पुणे गाठणे शक्य आहे. नाशिक - अहमदनगर- पुणे या तीन जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासाला या प्रस्तावित मार्गामुळे चालना मिळणार आहे. राज्यभरात दळणवळ व्यवस्था बळकट करण्यासाठी रस्ते विकास महामंडळ 4 हजार 217 किलोमीटर महामार्गाचे जाळे विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अंतर्गत नाशिक- पुणे औद्योगिक महामार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी वीस हजार कोटी इतका रुपये खर्च असून 180 किलोमीटर महामार्गामुळे नाशिक ते पुणे ते अंतर कमी होणार आहे तसेच औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे हा नवीन औद्योगिक मार्ग पुणे- राजगुरुनगर- चाकण- मंचर- नारायणगाव- आळेफाटा- घारगाव -संगमनेर -सिन्नर - नाशिक असा प्रस्तावित आहे