नाशिक : तीन वर्षांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकमध्ये लॉजिस्टिक हब बनण्याची पूर्ण क्षमता असल्याचे जाहीर करीत त्यासाठी स्थानिक नेते, कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्या दिशेने नाशिकची पावले पडण्यास प्रारंभ झाल्याचे दिसू लागले आहे. महिंद्रा लॉजिस्टिकने नाशिकमध्ये वेअर हाउसमध्ये जवळपास पाचशे कोटींची गुंतवणूक केली असून पुढच्या काळात लॉजिस्टिक हब बनण्याच्या दिशेने सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यातून आधीच अस्तित्वात असलेल्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाबरोबरच आता समृद्धी महामार्ग, प्रस्तावित असलेला सुरत-चेन्नई एक्सप्रेस वे आदींमुळे देशातील प्रमुख शहरांशी नाशिक थेट जोडले जाणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त नुकतेच ५० एकर जागेवर नवीन वेअर हाउसचे भूमिपूजन करण्यात आले. या ठिकाणी आधीच ८३ हजार स्क्वेअर फूट क्षमता असलेले वेअर हाउस 'ग्रीन बिल्डिंग' म्हणूनही प्रमाणित झाले आहे. त्यानंतर शेकडो कोटींची गुंतवणूक करीत तिसऱ्या सर्वांत मोठ्या वेअर हाउस प्रकल्पाचे वासाळी शिवारात प्रजासत्ताकदिनी भूमिपूजन करण्यात आले.
लॉजिस्टिक्स क्षेत्रात भिवंडीनंतर नाशिकचे भौगोलिक स्थान अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. समृद्धी महामार्ग तसेच सुरत-चेन्नई हायवेमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू अशा अनेक राज्यांसोबत होणार आहे. त्यामुळे माल वाहतुकीसाठी नाशिक सोईस्कर ठरत आहे. त्याच अनुषंगाने महिंद्रा लॉजिस्टिक्सने नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. या ठिकाणी ५० एकर जागेत शेकडो कोटींची गुंतवणूक करीत सुमारे तीन लाख स्क्वेअर फुटांचा वेअर हाउस प्रकल्प साकारणार आहे. त्यातून किमान ५०० पेक्षा जास्त अधिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.