सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर चालती कार पाठीमागून पेटल्याचे पाहिल्यानंतर दुचाकीस्वाराने कारला ओव्हरटेक करीत चालकास कल्पना दिल्याने मोठा अनर्थ टळला. सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील लहानू मुरलीधर करवर यांच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला आहे. मुलास सिन्नर येथील रुग्णालयात फेरतपासणीसाठी घेऊन येत सदर घटना घडली. करवर हे त्यांची पत्नी व मुलास कारने (क्र. एमएच ०४ बीके ४६२६) सिन्नरकडे जात असताना पाठीमागून कारने पेट घेतला. कारच्या पाठीमागे असलेल्या दुचाकीस्वाराच्या सदर घटना लक्षात आली. त्याने कारला ओव्हरटेक करीत चालक करवर यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने कार रस्त्याच्या कडेला उभी केली. करवर कुटुंबीय सुरक्षित बाजूला गेल्यानंतर कारने पेट घेतला. एमआयडीसी व सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशामक बंबास माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसीच्या अग्निशामक बंबाने आग विझविली. दुचाकीस्वाराने दाखविलेल्या प्रसंगावधानाने सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
नाशिक - पुणे महामार्गावर चालत्या कारला अचानक आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:21 AM